मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षांत प्रवेश करताना प्रत्येकाचेच मन आशावादाने आणि अपेक्षांनी भरुन गेलेले असते. सरत्या वर्षांत राहून गेलेल्या अनेक गोष्टींची पूर्तता करण्याबरोबरच नव्यानं करावयाच्या कित्येक गोष्टींची जंत्री मनात जमू लागते. नेहमीच झगमगटात राहणाऱ्या सिनेक्षेत्रातील तारे-तारकाही याला अपवाद नाहीत. काही जण 2019 मधील यशाने आनंदी आहेत, तर काहींना नव्या वर्षांत यशाची चव चाखायला मिळेल अशी आशा आहे. काहींना फिरायला जायचे आहे, तर काहींना कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. पाहूया सध्याच्या आघाडीच्या कलाकारांचे काय आहेत न्यू ईअर रिझॉल्युशन्स!
पाहता पाहता 2019 मावळले आणि नवीन वर्ष उजाडले. नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक मंडळी नवीन संकल्प, योजना आखत असतात. यात सेलिब्रिटी देखील मागे नाहीत. आरोग्य राखण्याबरोबरच परदेशात फिरणे, नवीन प्रोजेक्ट हाती घेणे, अभिनयात आणखी मॅच्यूरिटी आणणे यासारख्या गोष्टी ही सेलिब्रिटी मंडळी ठरवत असतात. बॉलिवूड कलाकार नवीन वर्षाच्या स्वागतावरुन खूपच उत्साही असतात आणि याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येतो. काही सेलिब्रिटींनी आपल्या नवीन वर्षातल्या योजना, आशा-अपेक्षांचे कथन केले आहे.
सलमान खान
नवीन वर्ष कधी सुरू होते आणि कधी संपते याचा थांगपत्ताही लागत नाही. 2019 वर्ष हे काल सुरू झाल्यासारखे वाटत होते. आता नवीन वर्षे आले देखील. 2020 वर्ष हे माझ्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कारण मी पुन्हा एकदा मामा बनलो आहे. अर्पिता ही पुन्हा आई झाली आहे. आमच्या कुटुंबात एक नन्ही परी आली आहे. याशिवाय 2020 मध्ये आमच्या घरात अनेक कार्यक्रम एकाचवेळी होणार आहेत. करियरचा विचार केल्यास माझा चित्रपट राधे प्रदर्शित होणार आहे. तसेच किक-2 येणार आहे. यानंतर अनेक चित्रपट रिलिज होत आहेत.
श्रद्धा कपूर
नवीन वर्षाचे स्वागत हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. संपूर्ण वर्षभर काम करुन जेव्हा आपण थकतो, तेव्हा नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करावे, असे वाटत राहते. या जल्लोषामुळे मनात नवीन ऊर्जा तयार होते आणि त्यामुळे आपण नव्या दमाने पुन्हा कामाला लागतो. वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने करते. या आशीर्वादामुळे गणपती आपल्याला सर्व संकटापासून वाचवतो आणि जीवन समृद्ध करतो. 2020 मध्ये माझे नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट करियरसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. स्ट्रिट डान्सर, बागी-3, स्त्री-2 याचा उल्लेख करावा लागेल. चित्रपट पाहण्यासाठी श्रोते गर्दी करतील, अशी अपेक्षा आहे. तसेच नव्या वर्षात परदेशात फिरण्याचीही योजना आखली आहे. काही काळ मी कुटुंब आणि मित्रांसमवेत घालवणार आहे.
सारा अली खान
सारा अली खान ही आजच्या पिढीतील आघाडीची नायिका मानली जाते. तिने देखील नव्या वर्षात अनेक संकल्प केले आहेत आहेत. ती म्हणते, खूप काम करणे, खूप धिंगामस्ती करणे हा माझ्या आयुष्याचा फंडा आहे. खूप काम करा आणि मगच मस्ती करा, असे मला वाटते. मेहनतीला घाबरु नका आणि धमाल करतानाही अडखळू नका. नवीन वर्षाचे स्वागत मी नेहमीच जल्लोषात करते. नवीन वर्षात माझ्या अभिनयात अधिक प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न करणार आहे. हेल्थ आणि ब्यूटीवर विशेष लक्ष देणार आहे, असे सारा अली खानने म्हटले आहे.
आमीर खान
मि. परफेक्शनिस्ट आमीर खान हा फारसा सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाही. निवडक लोकांत वावरणारा आमीर खान हा नव्या वर्षातील योजनेबाबतही तितकाच सजग आहे. तो म्हणतो, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मी आईचे आशीर्वाद घेतो. माझ्यासाठी आई खूपच महत्त्वाची आहे. नेहमीच मी नव्या वर्षाचे स्वागत कुटुंबासमवेत करतो. 2020 साठी मी काही योजना आखल्या आहेत. नवीन वर्षात जुन्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणार आहे. याशिवाय बॉडी शेपवरही लक्ष देणार आहे. या आधारावर मी एखादा आवडीचा चित्रपट साइन करेल, असे आमीर खान म्हणतो. 2020 मध्ये मी पत्नी किरणला एखाद्या सुंदर ठिकाणी घेऊन जाण्यास उत्सुक आहे. कामाच्या व्यग्रतेमुळे आम्ही बऱ्याच काळापासून फिरायला गेलो नाही. किरण माझी जोडीदार आणि हमसफर आहे. तिने प्रत्येक स्थितीत मला साथ दिली आहे. नवीन वर्षही आनंदात आणि समाधानाने जावे यासाठी तिने मला नेहमीप्रमाणे मागदर्शन करत राहवे, अशी अपेक्षा आहे.
रणबीर कपूर
नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करतो. यावर्षी माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार आहे, असे रणबीर कपूर म्हणतो. हे वर्ष माझ्यासाठी आणखी एका गोष्टीसाठी स्पेशल आहे. कारण माझे वडिल ऋषी कपूर हे आजारातून बरे होऊन घरी आले आहेत. तसेच नवीन वर्षात माझा चित्रपट ब्रह्मास्त्र आणि शमशेरा रिलिज होत आहेत. दोन्ही चित्रपटांकडून मला खूप अपेक्षा आहेत. वास्तविक नवीन वर्षाच्या आधारावर मी फार नियोजन करत नाही. कारण आपल्याला काळानुसार चालावे लागते. परंतु निश्चित करियरच्या दृष्टीने मी काही प्लॅन केले आहेत. यात तब्येत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ती राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वांना नवीन वर्ष समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
सोनम परब