पिंपरी -ऐन करोना काळात आयटी कंपनी सुरू करून ती यशस्वीपणे चालवत एका 32 वर्षीय मराठी तरुणाने आयटी क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. स्वतःच्या जिद्दीवर वेगळे काहीतरी करायचे, आपल्या बुद्धीचा, अनुभवाचा स्वतःसाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वापर करायचा या विचाराने धनेश इंदोरे या शेतकरी कुटुंबातील तरुणाने टेक ऑर्बीट सोल्युशन नावाची आयटी कंपनी स्थापन केली. त्या साठी परदेशातील 70 लाख रुपये पॅकेजची नोकरी सोडली. अवघ्या दोन वर्षांत धनेशच्या कष्टांना यश आले असून कंपनीने 12 कोटींचा टर्न ओव्हर पूर्ण केला आहे. तसेच चार तरुणांना बरोबर घेऊन सुरू केलेल्या या कंपनीत आज 125 तरुण नोकरी करत आहेत.
धनेश इंदोरे हा मूळचा आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. त्याने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेतच पूर्ण केले. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. मुळचा धडपड्या स्वभाव आणि स्वतःच काहीतरी उभे करायची जिद्द असल्याने नोकरी करतानाच त्याने विविध व्यवसाय करण्यास सुरुवात केली. यामध्ये हॉटेलिंग, माल वाहतूक, बांधकाम या व्यवसायांचा समावेश आहे.
यातील काही व्यवसायांत यश आले तर काही व्यवसायांत अपयश आले. शेवटी दुबई येथे एका मोठ्या आयटी कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करत असताना धनेशने स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी धनेशला स्विझरलॅंड मधील एका कंपनीने 70 लाख रुपये पगाराची नोकरी देऊ केली.
मात्र, ती नोकरी सोडून धनेश पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परत आला. मार्च 2020 मध्ये भारतासह जगभरात करोनाचा कहर सुरू असताना चार तरुण इंजिनिअर्सना नोकरीवर घेत बाणेर येथे एका छोट्या फ्लॅट मध्ये धनेशने आपली कंपनी सुरू केली. कंपनी सुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षांत कंपनीने दोन कोटींचा टर्न ओव्हर पूर्ण केला. आज त्याच्या कंपनीचा टर्न ओव्हर दोन वर्षांत बारा कोटींवर पोहचला आहे.
मायक्रोसॉफ्ट, डेल, सॅप, गुगलबरोबर पार्टनरशिप धनेश याच्या कंपनीला दोन वर्षांत अमेरिका, इंग्लंड या देशातील कंपन्यांची सर्वाधिक कामे मिळाली आहे. त्यानंतर भारतातील बेंगलोर तसेच इतर राज्यांतील कामे मिळाली आहेत. कंपनीच्या कामाचा दर्जा पाहून मायक्रोसॉफ्ट, डेल, सॅप, गुगल या जगविख्यात कंपन्यांनी आपली पार्टनरशिप धनेशच्या कंपनीला देऊ केली आहे.