पुणे : तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या “स्वच्छ एटीएम’ या योजनेचा बोजवारा उडाला असून, या मशीनची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीलाच महापालिकेने कामाचा ठेका रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे. त्यांना तीस दिवसांची मुदत दिली असून, या कालावधीत ती कंपनी समाधानकारक काम करेल याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
महापालिकेला योजनेसाठी एकही रुपया खर्च करावा लागला नाही. नऊ ठिकाणी बसवलेल्या मशिनची त्यात पैसे असतील अशी समजूत करून समाजकंटकांनी काही दिवसांतच तोडफोड केल्याचे प्रकार घडले आहेत. या मशिन्स दुरुस्त कराव्यात अशा सूचना महापालिकेने संबंधित कंपन्यांना दिल्या आहेत. अद्याप त्या दुुरुस्त झाल्या नाहीत, यामुळे महापालिकेने संबंधित कंपनीला नोटीस पाठवली आहे. “तीस दिवसांत दुरुस्ती केली नाही तर तुमचा ठेका रद्द केला जाईल’, अशी तंबी या नोटीसद्वारे देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
या कंपनी आणि त्यांच्या प्रतिनिधींना महापालिकेने वारंवार ई-मेलद्वारे संपर्क साधला होता. परंतु, त्यास कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यापूर्वी दहा दिवसांची मुदत या कंपनीला दिली होती. मशीनची सुरक्षा वाढवावी, तेथे सुरक्षारक्षक नियुक्त करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा दुसरी नोटीस पाठवून ठेका रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नेमकी योजना काय?
प्लॅस्टिक बाटल्या, ग्लास, मेटालिक कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर्स कचरा पेटीत न टाकता, “स्वच्छ एटीएम’मध्ये टाका आणि पैसे मिळवा, अशी ही योजना आहे. शहरात चाळीस ठिकाणी ही मशीन्स बसवली जाणार होती. मात्र केवळ नऊ ठिकाणी ही मशीन बसवली गेली, उर्वरीत 29 ठिकाणी अद्याप मशीन्स बसवली नाहीत. या आधी दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली, वाराणसी आदी शहरांप्रमाणेच पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर सव्वा महिन्यापूर्वी जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, कोरेगाव पार्क, खराडी आयटी पार्क, हायस्ट्रिट बालेवाडी, कोथरूड एमआयटी कॉलेज आणि पौड रस्ता तसेच राजीव गांधी उद्यान कात्रज आणि
सारसबाग येथे या मशीन बसवण्यात आल्या होत्या.
लाभ किती जणांनी घेतला?
मशीन्स बसवल्यानंतर ते चालू असेपर्यंत प्रत्येक ठिकाणी सुमारे 800 ते 1200 नागरिकांनी पुनर्वापर योग्य असे प्लॅस्टिक टाकले. यातून (प्रतिनग) प्लॅस्टिकच्या बाटलीसाठी 1 रुपया, काचेच्या बाटलीसाठी 3 रुपये, धातूच्या कॅन्ससाठी 2 रुपये संबंधित नागरिकांना मिळाले.
मशीनचे नुकसान
मशीनला प्रतिसाद मिळू लागला होता, परंतु काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी या डिजिटल मशीनची मोठी नासधूस केली. मशीनचा स्क्रीन तोडणे, यात पैसे आहेत समजूत मशीन फोडणे, मशीनचे विद्रुपीकरण करणे, वायरींग तोडणे आदी प्रकार केले गेले.