पुणे – मनपाच्या कसबा पेठेतील जन्म मृत्यू नोंदणी मुख्य कार्यालयातील सॉफ्टवेअरचा ऍक्सेस मिळवून एका मुलाच्या जन्म दाखल्यात परस्पर बदले करण्यात आले. यात मुलाचे नाव “वेदांत’ऐवजी “मोहंमद’ करत वडिलांचे नावही बदलण्यात आले. याबद्दल मुलाच्या वडिलांनी जानेवारी 2023 मध्ये तक्रार दिली होती. यावर तब्बल 11 महिन्यांनी जाग आलेल्या मनपा प्रशासनाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद मखर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 30 जानेवारी 2023 रोजी अमृतसर येथील एका डॉक्टरने व्हॉट्सऍपद्वारे तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्यांचा मुलगा वेदांत मेहान गुप्ता याचा जन्मदाखला 28 जानेवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. पण, त्यात मुलाचे नाव बदललेले, तर पित्याचे नाव वगळलेले दाखवण्यात आले. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावर खातेप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, क्षेत्रीय अधिकारी डॉ. सुजाता माने यांनी चर्चा करुन सायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये दि.9 ते 10 जानेवारीदरम्यान हा नाव बदलण्याचा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.
आधी दिली नाही दाद
यासंदर्भात सायबर पोलिसांनी 4 सप्टेंबर रोजी दिलेल्या अहवालात जन्म-मृत्यू कार्यालयातील आयडीचा ऍक्सेस असलेल्या व्यक्तीने नातेवाईकांच्या मदतीने हा बदल केल्याचे म्हटले गेले. यासंदर्भात जन्म मृत्यू कार्यालयाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यालयातील प्रतिनिधी पाठवण्याची मागणीही सायबर पोलिसांनी केली होती. मात्र सप्टेंबरपासून कोणीच फिर्यादी आले नाहीत. सरतेशेवटी 9 नोव्हेंबर रोजी कार्यालयाच्यावतीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
सायबर पोलीस म्हणतात…
“जन्म मृत्यू नोंदणी सॉफ्टवेअर प्रणालीचा ऍक्सेस हा कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडेच असतो. यामुळे यात कार्यालयातीलच कोणाचातरी सहभाग असू शकतो. त्याशिवाय हा बदल होणे अशक्य आहे. तसेच या प्रकारे आणखी काही बदल केले गेले असतील, तर प्रकरण मोठे होऊ शकते असा संशय सायबर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ठळक मुद्दे…
- मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयातील खळबळजनक प्रकार
- तब्बल 11 महिन्यांनी दाखल केली पोलीस तक्रार
- सायबर पोलीस म्हणतात, “प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता’