नगर – जामखेड येथील काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या करोनाबाधित व्यक्तींच्या मुलांना करोनाची लागण झाली असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा फैलाव वाढतच चालला असून, करोनाबाधितांची संख्या 31 वर पोहचली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे रविवारी (दि.19) रोजी पाठविलेल्या अहवालापैकी दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही बाधित काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या रुग्णाची मुले आहेत. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची संख्या 31 वर पोहचली आहे. याशिवाय मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधित व्यक्तीचा पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. याशिवाय, आज आणखी पाच जणांना त्यांचे 14 दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला. तसेच एका 76 वर्षीय व्यक्तीचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना संस्थात्मक आणि रुग्णालय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना मुक्त झालेल्यांची संख्या आता 18 झाली आहे.
सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये 11 जण उपचार घेत आहेत. जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्याचे 29 आणि 35 वर्षीय मुलगे बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णाची संख्या आता 31 झाली आहे.
मुकुंदनगर येथील 76 वर्षीय रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह
12 रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, मुकुंदनगर येथील 76 वर्षीय बाधित रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन रुग्णालय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगरसाठी दोन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्याची विनंती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. यानुसार या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्ज्ञ पथकांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली होती. या पथकात डॉ. पल्लवी सापळे आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. भारत चव्हाण हे नगर येथे करोना च्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपचार पद्धती बरोबरच तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत.