कोथरूडच्या शेल्टरमधून पळालेल्या व्यक्तीला दणका
पुणे – शेल्टरमध्ये व्यवस्था करण्यात आलेल्या व्यसनी तरूण पोलिसांच्या अंगावर थुंकल्याने पोलिसांना त्यावर बळाचा वापर करत काठीचा प्रसाद द्यावा लागला. कोथरूडमध्ये हा प्रकार घडला.
लॉडाऊनमध्ये तरुणाची शेल्टरमध्ये व्यवस्था करण्यात आली होती; मात्र व्यसनी असल्याने तो पळून गेला होता. दरम्यान, त्याला पकडून पुन्हा शेल्टरमध्ये आणताना पोलीस, महापालिका कर्मचारी तसेच नागरिकांच्या अंगावर तो थुंकत होता. त्यामुळे त्या तरुणाला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला.
याबाबत पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या, कोथरूड शिवाजी महाराज स्मारकाजवळ महापालिकेच्या शाळेत बेघर आणि कामगारांची राहण्याची सोय केली आहे. एक शेल्टर केलेली अमितकुमार नावाची व्यक्ती पळून गेल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून कोथरूड पोलिसांना मिळाली. घटनेविषयी माहिती घेताना पोलिसांना लक्षात आले, की अमितकुमारने शेल्टरच्या मागिल बाजूच्या काचा फोडल्या होत्या. त्याच्यासोबत राहणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने त्याने शौचालयात घाणही केली होती. त्याला तंबाखू, सिगारेट मिळत नाही, याच कारणाने तो तेथून पळून गेला. त्याचा शोध पोलिसांनी घेतला आणि त्याला पुन्हा शेल्टरजवळ आणले. परंतु, आत जाण्यासाठी तो नकार देत होता.
करोना संसर्गाविषयी सर्वच स्तरावर खबरदारी घेतली जात असताना तो तरुण पोलिसांसह अन्य नागरिकांवर अंगावर थुंकला. तसेच पोलिसांना शिवीगाळही केली. तो ऐकतच नाही म्हटल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.’