पिरंगुट – खरेदीसाठी शिथिलता मिळताच मुळशीत नागरिकांनी रविवारी (दि. 19) गर्दी केली होती. विशेषतः मटण मार्केटमध्ये खवय्यांची मोठी रांग लागली होती. यात सगळीकडे मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवार (दि. 14) ते गुरुवार (दि. 23) या कालावधीत मुळशी तालुक्यातील सहा गावांत टाळेबंदी आहे. तालुक्यात अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने टाळेबंदी पुकारली आहे. टाळेबंदीच्या काळात रविवारपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेबरोबरच भाजीपाला विक्रीस सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
तसेच आखाड महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने चिकन, मटण आणि मासे विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच मटण मार्केटमध्ये खवय्यांनी गर्दी केली होती. भूगाव, पिरंगुट, घोटवडेफाटा, उरवडे, घोटवडे, पौड आदी भागात मांसविक्रीच्या दुकानात गर्दी होती.