पुणे – विमानतळांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या काळात विमानतळांवर बॉडी स्कॅनर बसविण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशभरात 198 बॉडी स्कॅनर बसविण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी पुणे विमानतळावर 12 बॉडी स्कॅनर बसविण्यात येणार आहेत.
दहशतवादी हल्ल्यांचा धोका, अवैध वस्तुंची तस्करी, प्रवासी सुरक्षितता आदीच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर विविध सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळांवर बॉडी स्कॅनर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील 63 विमानतळांवर 198 बॉडी स्कॅनर बसविण्यात येणार असून, विमानतळांवरील मेटल डिटेक्टर आणि हॅन्ड स्कॅनरची जागा येत्या काळात बॉडी स्कॅनर घेणार आहे. यामुळे प्रवाशांची तपासणी करणे सोपे जाणार आहे.
देशातील सुमारे 100 हून अधिक विमानतळांचा मालकी हक्क आणि व्यवस्थापन प्राधिकरणाकडे आहे. 198 बॉडी स्कॅनरपैकी चेन्नई, कोलकत्ता, श्रीनगर, विशाखापट्टणम, बंगळुरू, भुवनेश्वर, गोवा, इम्फाळ आदी विमानतळांवर स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. यासाठी निविदा जाहीर झाल्या असून, यामध्ये तीन कंपन्यांचा सहभाग आहे. या कंपन्यांनी प्राधिकरणाचे तांत्रिक निकष पूर्ण केल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असून, एका कंपनीला याबाबतचे कंत्राट देण्यात येणार आहे.
पुण्यात यापूर्वीच प्रयोग
पुणे विमानतळ देखील देशातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक आहे. येथे खासगी विमानांच्या उड्डाणांसह हवाई दलाच्या विमानांची उड्डाणे आणि सराव होतात. येथे यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर काही महिन्यांसाठी बॉडी स्कॅनर बसविले होते. बॉडी स्कॅनरमधून जाताना प्रवाशांना जॅकेट, बूट, बेल्टसह धातूची वस्तू (मेटॅलिक) बाहेर काढून ठेवावी लागणार आहे.