लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व कामकाज ठप्प झाले असून सुमारे दीड महिना रोजगार मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात घरबसल्या वेळ घालविण्यासाठी अनेक प्रकारची चॅंलेंज दिली घेतली जात असताना बॉलीवूड भाईजान अर्थात सलमान खान याने अन्नदाता चॅंलेज स्वीकारण्याची गळ घातली आहे. यासाठी त्याने ट्विटरवर त्याच्या दोन जवळच्या मित्रांचे फोटो शेअर केले आहेत. बाबा सिद्दिकी आणि जीशान सिद्दिकी यांनी सुमारे सव्वा लाख कुटुंबांना रेशन पुरविले आहे.
सलमानने हे फोटो शेअर करताना देशाच्या कोविड 19च्या अडचणीच्या काळात तुम्हीही या चॅंलेजचा हिस्सा बना, अन्नदान करा असे आवाहन केले आहे. यासाठी स्वतः किंवा विश्वासू व्यक्तीची मदत घ्या, असेही तो सुचवितो. स्वतः सलमानने काही दिवसांपूर्वी ट्रकभर अन्नपदार्थ रोजंदारी करणाऱ्या लोकांसाठी पाठविले होते. तसेच त्याने फेडरेशनने यादी पाठविलेल्या 16 हजार मजुरांच्या खात्यात 4 कोटी 80 लाखांची रक्कम जमा केली होती.