वाघोली -वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या गावांच्या करोना परिस्थिती व घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा केंद्रीय पथकाने रविवारी (दि. 10) घेतला.
करोना परिस्थितीमध्ये आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन केलेला सर्व्हे, सर्व्हेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, गंभीर आजार असणाऱ्यांची तपासणी व पुढील उपाययोजना, वरिष्ठांनी केलेल्या सूचना व आदेशाची ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेली अंमलबजावणी, गाव सील करणे, गावामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची प्राथमिक तपासणी, मास्क वापरणे, औषध फवारणी करणे, तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या वतीने परप्रांतीय नागरिकांना जेवण व किराणा वाटप केल्याची माहिती केंद्रीय पथकाने घेतली.
वाघोली ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी केलेल्या उपाय योजनाच बाबतीत पथकाने समाधान व्यक्त केले. यावेळी केंद्रीय पथकातील डॉ. शर्मा, डॉ. रॉय, तहसीलदार सुनील कोळी, बीडीओ प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सर्जेराव वाघमारे, वर्षा गायकवाड, नागसेन लोखंडे, सरपंच वसुंधरा उबाळे उपस्थित होते.
केसनंदमध्ये आढळला पहिला करोना रुग्ण
केसनंद (ता. हवेली) येथील 48 वर्षीय व्यक्तीची खासगी लॅबमध्ये केलेल्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. केसनंदमध्ये पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून पॉझिटिव्ह रुग्णाला पुढील उपचारासाठी पुणे शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. केसनंदमध्ये पॉझिटिव्ह सापडलेली व्यक्ती वाघोलीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका संस्थेमध्ये काम करीत आहे. येथील दोघांची खासगी लॅबमध्ये करोना चाचणी करण्यात आली होती, त्यातील एक निगेटिव्ह तर केसनंद येथील एक पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
औषध फवारणी करून सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा अहवाल येईपर्यंत घरातच क्वारंटाइन राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून गावामध्ये सर्व्हे केला जात आहे. खबरदारी घेण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव यांनी सांगितले.