प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 – देशातील बोगस विद्यापीठाची नावे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रसिद्ध केली आहे. देशातील 21 विद्यापीठे बोगस असून, त्यात सर्वाधिक बोगस विद्यापीठे राजधानी दिल्लीत असल्याचे स्पष्ट होत आहे. यात नागपुरातील एका विद्यापीठाचा समावेश आहे. पण, यंदा बोगस विद्यापीठाची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.
“यूजीसी’ने देशातील 21 बोगस विद्यापीठाची यादी संकेतस्थळावर यादी जाहीर केली आहे. गेल्यावर्षीच्या यादीमध्ये 24 बोगस विद्यापीठे होती. त्यामुळे तीन विद्यापीठे कमी झाल्याचे दिसून येत आहे. या यादीत दिल्लीमध्ये आठ, उत्तर प्रदेशमधील चार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीमध्ये प्रत्येक एक बोगस विद्यापीठ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठाचा समावेश आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय, राज्य आणि अभिमत विद्यापीठांना किंवा संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार संस्थांनाच पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अन्य संस्थांना नावात विद्यापीठ हा शब्द वापरता येत नाही. संबंधित 21 संस्था विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना बोगस ठरवण्यात आले आहे. त्यांना पदवी प्रदान करण्याचा अधिकार नसल्याचे यूजीसीने म्हटले आहे.