पदुच्चेरीतील घटना
पदुच्चेरी – येथील कारागृहात असलेल्या एका कैद्यानेच राजभवनात आणि रेल्वे स्टेशन वर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन पोलिस नियंत्रण कक्षाला केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीश शर्मा असे या कैद्याचे नाव आहे. कार चोरीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या कलापेट मध्यवर्ती कारागृहात आहे. रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमाराला त्याने हा कॉल केला.
राजभवन आणि रेल्वे स्थानकावर शक्तीशाली बॉम्ब ठेवण्यात आला असून तो पुढील चोवीस तासात फुटण्याची शक्यता आहे असे त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले होते. त्याच्या कॉलमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. परंतु हा खोटा कॉल असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्याच्या माग काढून शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या अनुषंगाने पोलिसांनी रविवारी या कारागृहावर छापा घातला असता अंडरट्रायल कैद्यांच्या यार्डात पोलिसांना तब्बल 11 मोबाईल फोन आढळून आले. ते जप्त करण्यात आले आहेत.