नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने दिल्लीतील आपल्या उमेदवाराच्या यादीत एक बदल केला आहे. त्यांनी त्रिनगर मतदार संघातून माजी मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना दिलेली उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पत्नी प्रीती तोमर यांना उमेदवारी दिली आहे. तोमर यांनी सन 2015 ची विधानसभेची निवडणूक लढवताना आपल्या शैक्षणिक पात्रतेची खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना निवडणूक लढवण्यास अनुमती नाकारली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीत बदल करण्यात आला आहे.
तोमर यांनी या विषयी पक्षाला कल्पना दिली व आपल्या पत्नीला उमेदवारी द्यावी अशी विनंती केली, ती विनंती पक्षाने मान्य केल्याचे तोमर यांनी सांगितले. त्यानुसार काल सोमवारी प्रीती तोमर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक येत्या 8 फेब्रुवारीला होणार आहे.