चोंभूत (स्वप्नील भालेराव) – चोंभूत ता. पारनेर येथे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जांबुत – चोंभूत येथे कर्तव्य बजावत असणाऱ्या एका पोलीसाने आपल्या जीवाचीबाजी लावत बिबट्याच्या तावडीतून गायीच्या वासराचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे.
चोंभूत ता. पारनेर येथे रस्त्यावरील नाकाबंदीवर रात्रपाळी वर असलेले पो. कॉ. शरद पवार व होमगार्ड दशरथ चौधरी समवेत कोरोना प्रतिबंध समितीतील सचिन भालेराव, प्रवीण भालेराव, नितीन भालेराव, अविनाश भालेराव हे आपले कर्तव्य बजावत असताना अचानक दि.22रोजी रात्री 12.15 वा. नाकाबंदी पासून 300 मी अंतरावर एका वासराचा मोठयाने आवाज आल्याने पो. कॉ. शरद पवार समवेत असलेल्या तरुणांनी ओरडणाऱ्या वासराकडे धाव घेतली असता त्यांना किसन बाळाजी गुंजाळ यांच्या गोठ्यातील एका वासरा वर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले. वासराच्या डाव्या कानावर ओरखडल्याच्या खुणा व मातीत बिबट्याचे ठसे असल्याचे दिसून आले.पो.कॉ.पवार व सोबत असलेले तरुण घटनास्थळी जाईपर्यंत त्याअगोदर बिबट्याने शेजारच्या शेतात पलायन केले. पो.कॉ. पवार व स्थानिक तरुण यांच्या सतर्कते मुळे वासराचे प्राण वाचले.
“जांबुत – चोंभूत गावांच्या सीमा रेषेवरून कुकडी नदी वाहत असल्याने ऊस शेती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्याला लपण क्षेत्र मोठे आहे. अधून मधून पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत असतात. त्यामुळे घाबराटीचे वातावरण पसरल्याने या परिस्थितीवर वनविभागाने तातडीने गौतमनगर परिसरात पिंजरा लावावा ही मागणी आहे.”
– दत्तात्रय कोल्हे ( स्थानिक ग्रामस्थ, गौतमनगर ( चोंभूत )