वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील वाकसई ग्रामपंचायत वगळून मावळ तालुक्यातील एकूण 29 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका व पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
थेट जनतेतून सरपंचांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूकांची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 3) केली. यात मावळ तालुक्यातील वाकसई ही ग्रामपंचायत वगळून मावळ तालुक्यातील एकूण 19 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका व पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. 6 ऑक्टोबर रोजी तहसीलदार याची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. त्यानंतर दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ह्यातील पात्र नामनिर्देशनपत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निकालांची अधिसूचना प्रसिद्ध करतील, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील या गावांच्या सार्वत्रिक निवडणूका आणि पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सार्वत्रिक निवडणूका असलेली गावे – 19
जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, साळुंब्रे, बेबडओहोळ, लोहगड, शिळींब, कोंडीवडे (आ.मा.), कल्हाट, आंबळे, भाजे, सांगिसे, मुंढावरे, उदेवाडी, मळवंडी ढोरे, दिवड, ओवळे, डोणे, आढले बुद्रुक.
पोटनिवडणूक असलेली गावे – 10
चिखलसे, शिवणे, नवलाख उंब्रे, कुसगाव बुद्रुक, पुसाणे, शिरगाव, दारुंब्रे, तुंग, खांडशी, कान्हे.