प्रभासच्या 3 चित्रपटांचे बजेट तब्बल एवढे कोटी, आकडा बघून बसेल धक्का!

बाहुबली सिरीजच्या ऐतिहासिक यशानंतर अभिनेता प्रभासने मोठा टप्पा पार केलेला आहे. आता त्याची फक्‍त दक्षिण भारताचा स्टार अशी ओळख राहिलेली नसून संपूर्ण देशात त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ज्याप्रमाणे “बाहुबली’ने बॉक्‍स ऑफिसवर कलेक्‍शन केले, त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी प्रभासवर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक सुरू केली आहे.

त्यांना आशा आहे की, त्यांनी गुंतविलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे कमावतील. प्रभास सध्या तीन चित्रपट करत असून तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की, या तीनही चित्रपटांचे बजेट तब्बल 1000 कोटी रुपये आहे. यातील प्रभासच्या “राधेश्‍याम’ चित्रपटाचे शूटिंग नुकतेच परदेशात करण्यात आले. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहेत.

या चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. अजय देवगणबरोबर “तान्हाजी’ चित्रपट करणारे दिग्दर्शक ओम राऊत आता प्रभाससमवेत “आदिपुरुष’ चित्रपट साकारत आहे. या एपिक ड्रामाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे बजेट 450 कोटी आहे.

याशिवाय मेगास्टार अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत प्रभासचा एक चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये आहे. या तिन्ही चित्रपटांचे एकूण बजेट 1000 कोटी रुपयांवर जाते. भारतीय चित्रपटसृष्टीत आतापर्यंत एवढी मोठी रक्‍कम कोणत्याही अभिनेत्यावर लावण्यात आली नसल्याने यातून प्रभासचे सुपर स्टारडम दिसून येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.