पिंपरी – मद्यपान करुन विद्यमान नगरसेवकाशी उद्धट वर्तन करणाऱ्या लिपिकाला महापालिका आयुक्तांनी मोठा दिलासा दिला आहे. महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील “क’ दर्जाचे मुख्य लिपिक विनोद शिंदे यांनी मद्यपान करून नगरसेवकाशी उद्धट वर्तन केले होते. त्याची दखल घेऊन सेवानिलंबन करण्यात आले होते. मात्र, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई रद्द करून वेतवाढ स्थगित करण्याची सौम्य कारवाई केली आहे.
एक नगरसेवक नातेवाईकाचा स्मशान दाखला घेण्यासाठी 11 मार्च रोजी रात्री वायसीएम रूग्णालयात आले होते. रात्रपाळीवर कामावर असलेले शिंदे यांनी मद्यपान करुन अरेरावी व उद्धट वर्तन केले. लिपिकाची खातेनिहाय चौकशी करुन सेवानिलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मद्यपान करून कामावर हजर असल्याची कबुली शिंदे यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीसमोर दिली होती. पुन्हा असा प्रकार होणार नाही, अशी हमी त्यांनी दिली. सेवानिलंबनाऐवजी एक वेतनवाढ कायमस्वरूपी स्थगित करण्याची कारवाई आयुक्तांनी केली आहे.