कर्मचाऱ्यांच्या बहिष्काराचे “स्थायी’च्या सभेवर सावट

सातारा – नगरसेवक बाळू खंदारे याच्या आक्षेपार्ह वर्तनाचा फटका सोमवारी दि. 16 रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेला बसला आहे. कर्मचाऱ्यांनी “काम बंद’ आंदोलनाचा निर्धार कायम ठेवल्याने सभेच्या कामकाजाची अडचण होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे पालिकेच्या स्थायी व सर्वसाधारण सभा लांबणीवर पडल्या होत्या. बराच राजकीय उहापोह झाल्यानंतर नगराध्यक्ष माधवी कदम यांनी शंभरहून अधिक विषयांची विषयपत्रिका निश्‍चित करून सोमवारी दि. 16 रोजी स्थायी समितीची सभा कमिटी हॉलमध्ये निश्‍चित केली होती. मात्र, नगरसेवक बाळू खंदारे याने उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या टेबलावर चढून पॅंट उतरवण्याचे आक्षेपार्ह वर्तन केल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी “काम बंद’ आंदोलन करुन सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. खंदारे यांचा जोरदार स्टंट झाला.

पण वचक ठेवणारी कारवाई न झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थायी समिती सभा सचिव व कामकाजात सहभागी असणारे विभाग प्रमुख यांची अनुपस्थिती राहिल्यास प्रत्यक्ष स्थायी समितीचे कामकाज होणे अवघड आहे. अजेंडयावरील 106 विषय लटकण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या दालनात पालिकेचे सर्व कर्मचारी पुन्हा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता भेटणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे खंदारे प्रकरण मिटणार की चिघळणार, याचे उत्तर सोमवारीच मिळणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)