क्रिकेटला पुन्हा फिक्‍सिंगची कीड

कर्नाटक प्रीमिअर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेत सट्टेबाजी, फिक्‍सिंग आणि स्पॉट फिक्‍सिंग घडल्याचे स्पष्ट झाले आणि पुन्हा एकदा केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक देखील ढवळून निघाले. पाकिस्तानचा नासीर जमशेद याने देखील स्पॉट फिक्‍सिंग केल्याची कबुली देऊन खळबळ उडवली आहे. पाकिस्तान क्रिकेट लीग तसेच बांगलादेश क्रिकेट लीगमध्ये बुकींकडून प्रचंड पैसे घेऊन त्याने सामने फिक्‍स केले. धावा संथ काढणे, महत्त्वाच्या फलंदाजाला धावबाद करणे, या व अशा अनेक युक्‍त्या वापरून हे फिक्‍सिंग चालते. याने देखील आता क्रिकेटचे नियंत्रण असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हा सगळा प्रकार रोखायचा कसा याबाबत संभ्रमात पडली आहे.

केपीएलचे तसेच झाले आहे. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा सुरू झाली व अल्पावधीतच यश देखील मिळाले. मात्र “बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्युन देअर इज ए क्राइम’ असे म्हणतात याची अनुभूती आली. या स्पर्धेतील काही संघांशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती तसेच काही खेळाडू देखील यात गुंतल्याचे समोर आले आणि वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा फिक्‍सिंगची कीड भारतीय क्रिकेटला लागली असल्याचे स्पष्ट झाले. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सौरव गांगुली अध्यक्ष आहे आणि त्याने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन दोषींचे खरे चेहरे समोर आणू इतकेच नाही तर जन्माची अद्दल घडेल इतक्‍या टोकाची कठोर कारवाई केली जाण्याचे संकेत दिले आहेत.

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) मधील स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात आणखी दोन क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखेने बेल्लरी टस्कर्स संघाचा कर्णधार सीएम गौतम आणि विकेटकीपर अबरार काझी यांना अटक केली आहे. या फिक्‍सिंग प्रकरणात आतापर्यंत सहा केपीएल खेळाडूंना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखा मागील दोन मोसमातील फिक्‍सिंगची चौकशी करत आहे. यापूर्वी 26 ऑक्‍टोबरला बेंगळुरू ब्लास्टर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक विनू प्रसाद आणि फलंदाज विश्‍वनाथ यांना अटक केले होते. बेलागामी पॅंथर्सविरुद्ध खेळलेला सामना बुकींसह सामना फिक्‍स करण्याचा आरोप प्रशिक्षकावर आहे. रणजी मोसमात गौतम गोवा, तर अबरार मिझोरम संघात समावेश करण्यात आला होता. कर्नाटक आणि गोव्याकडून रणजी खेळण्याव्यतिरिक्‍त गौतम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाकडून आयपीएल खेळला होता.

खेळाडूंना केपीएलच्या अंतिम सामन्यात संथ फलंदाजी करण्यासाठी 20 लाख रुपये देण्यात आले होते. याशिवाय बेंगळुरू ब्लास्टर्सविरुद्ध सामन्यात झालेल्या फिक्‍सिंगमध्येही या दोघांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. या सामन्यात टस्कर्सचा कर्णधार गौतमने 37 चेंडूत 29 धावा केल्या, तर अबरार काझीने 6 चेंडूत 1 धाव केली होती. गौतम कर्नाटकातील मुख्य खेळाडूंमधील एक आहे. 2013-14 आणि 2014-15 मध्ये कर्नाटकने जिंकलेल्या विजेतेपदामध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो भारत “अ’ संघासाठीही खेळला आहे. सय्यद मुश्‍ताक अली ट्रॉफीसाठी या दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. कर्नाटक प्रीमिअर लीगमधील मॅच फिक्‍सिंगचा मुद्दा पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये समोर आला होता, जेव्हा बेलगामी संघाचा मालक अली अश्‍फाक थारायाला अटक करण्यात आली होती. यानंतर, 26 ऑक्‍टोबरला बेंगळुरू ब्लास्टर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक वीणू प्रसाद आणि फलंदाज विश्‍वनाथन यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात गुन्हे शाखेने मागील आठवड्यात बंगळुरू संघाचा खेळाडू निशांत सिंह शेखावत याला अटक केली होती.

थोडी इतिहासाची देखील धास्ती वाटायला लागली आहे. 20 वर्षांपुर्वीच्या सगळ्या घटना एकदम डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. 1998-99 मध्ये जेव्हा मॅच फिक्‍सिंग प्रथम उघडकीला आली आणि जागतिक क्रिकेट गाजविणारेच काही बडे खेळाडू त्यात गुंतल्याचे स्पष्ट झाले तेव्हा ज्यांना आपण महान खेळाडू म्हणत होतो, तेच खलनायक निघाले. दिव्याखाली अंधार असणे बहुतेक यालाच म्हणत असावेत. दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए, हर्षेल गिब्ज, निकी बोए यांच्यासह न्यूझीलंडचा ख्रिस र्केन्स, भारताचा तत्कालीन कर्णधार महंमद अझरुद्दीन, अजय जडेजा, नयन मोंगिया, निखिल चोप्रा आणि दिल्लीचा अजय शर्मा यांची नावे समोर आली आणि क्रिकेट चाहत्यांना धक्‍काच बसला. त्यावेळी खरेतर प्रत्येकाने आपल्यावरील आरोप फेटाळले, पण खरे काय आहे ते क्रोनिएने प्रामाणिकपणे कबुल केले आणि सगळ्यांचीच गोची केली. सज्जन व्यक्तीवर आरोप झाले किंवा त्याने गुन्हा केल्यावर तसेच तसा आळ आला तर त्याला सोडवायला कोणीही येत नाही पण एका गुन्हेगारीवृत्तीच्या व्यक्तीला सोडवायला अनेक जण पुढे येतात असे म्हणतात. क्रोनिएने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली व अनेकांची अडचण करून ठेवली. पण त्याबाबत बीग फिश नामानिराळेच राहिले, कारण क्रोनिएचे एका विमान अपघातात निधन झाले, त्यामुळे साखळीची एक कडी तुटली व पूर्ण साखळी हाती लागलीच नाही. त्यावेळी हे फिक्‍सिंग जगजाहीर झाले तेव्हा खरेतर हा सगळा प्रकार त्याही पूर्वीपासून सुरू असेल अशी शक्‍यताही व्यक्‍त केली गेली.

अझरचे नाव जेव्हा समोर आले व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर बंदीची कारवाई केली तेव्हा देखील त्याने 1996 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकूनही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो सामना व अझरची भूमिका यांवर देखील संशय घेण्यात आला. एकतर अझर कोलकत्याच्या ईडन गार्डन मैदानावरचा सर्वात यशस्वी फलंदाज होता, त्याला येथील खेऴपट्टीचे ज्ञान जास्त होते. पहिली फलंदाजी करणारा संघ वर्चस्व राखतो हा इतिहास आहे, असे असताना अझरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय का घेतला, नंतर फिरकी गोलंदाजी खेळणे अत्यंत कठीण जाणार हे माहीत असतानाही त्याने घेतलेला निर्णय न पटणाराच होता आणि झालेही तसेच. पार्ट टाइम म्हणून कधीतरी गोलंदाजी करणारा सनथ जयसुर्या आपल्या फलंदाजांवर शिरजोर ठरला व भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सचिन तेंडुलकर वगळता एकाही फलंदाजाला श्रीलंकेची फिरकी गोलंदाजी खेळता आली नाही.

सचिन हा यष्टीरक्षक रमेश कालुवितर्णाकडून यष्टीचीत झाला आणि भारताचा पराभव स्पष्ट झाला. त्यावेळी नाही पण पुढे तीनच वर्षांनी फिक्‍सिंग उघडकीला आली आणि मग श्रीलंकेविरुद्धच्या त्या उपांत्य सामन्याबाबतही शंका घेतली गेली. यातून क्रोनिएने दिलेल्या कबुलीनंतर जागतिक क्रिकेट ढवळून निघाले. अशी स्थिती होती की प्रत्येक देशाच्या संघातील खेळाडू एकमेकांकडेही संशयाने पाहू लागले. जागतिक क्रिकेटचा अंत होतो की काय अशी भीती वाटू लागली होती. अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढाकार घेत तहहयात बंदीच्या शिक्षेचे किटकनाशक अवलंबले आणि फिक्‍सिंगची ही कीड व त्याची व्याप्ती आटोक्‍यात आणण्यात त्यावेळी यश आले. पण त्यानंतर गेल्या दोन दशकांत अनेक सामन्यांच्या निकालावर तसेच काही खेळाडूंच्या निष्ठेवर देखील शंका घेतल्या गेल्या मात्र त्यात काही वेगळे घडत असल्याचे ठोस पुरावे मिळाले नाहीत. भारताबाबत बोलायचे तर काही खेळाडूंवर कारवाई झाली, त्यावेळी सौरव गांगुलीला संघाचा कर्णधार बनविले गेले व त्याने निराशा झटकून संघाला पुन्हा एकदा उभे केले व त्याच क्षणापासून भारतीय क्रिकेटचा जागतिक क्रिकेटवर दबदबा वाढू लागला.

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजची मक्‍तेदारी संपविली तर भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखत आपली सत्ता तयार करायला सुरुवात केली. मानसिकरीत्या मरगळ आलेल्या भारतीय क्रिकेटमध्ये गांगुलीने जान फुंकली. अर्थात त्यानंतर कोणत्याही संघाचा पराभव झाला की अरे हा सामनाही फिक्‍सच असेल असे विधान सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी करू लागले व हीच या खेळासाठी धोक्‍याची घंटा होती. यातून कठोर कारवाईच्या बडग्याने या घटनांवर अंकुश लावला गेला, मात्र कोणतीही गोष्ट जास्त काळ दाबून ठेवू शकत नाही म्हणतात त्याप्रमाणे इंडियन प्रीमिअर लीगच (आयपीएल) नाही तर जगात जितक्‍या लीग सुरू झाल्या त्यातील काही सामन्यांबाबतही अशा अनेक अफवा उठल्या. त्याचवेळी कर्नाटकमध्ये केपीएल, तमिळनाडूत टीपीएल या लीग सुरू झाल्या. आता याच स्पर्धांवर फिक्‍सिंगची कीड लागल्याचे जगजाहीर झाले व अवघे क्रिकेट क्षेत्र हादरले.
देशद्रोह ठरावा
जे खेळाडू फिक्‍सिंगमध्ये दोषी आढळतील त्यांची आजवरची कामगिरी रद्द समजावी. तसेच त्यांचे पुरस्कार काढून घेतले जावेत. त्याला केवळ त्या क्रीडा संघटनेकडून केवळ तहहयात बंदीची कारवाई होऊ नये तर हा प्रकार एक फौजदारी गुन्हा किंवा देशद्रोह समजला जावा व त्यासाठी जितकी कठोर शिक्षा असेल ती द्यावी, तरच क्रीडा क्षेत्राला लागलेली ही कीड दूर होईल अन्यथा हीच कीड पुढे जाऊन संपूर्ण जागतिक क्रीडा क्षेत्र पोखरून टाकेल.

डोपिंगची लागण
जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (वाडा) रशियाला चार वर्षांसाठी निलंबित केले आहे. मॉस्कोतील प्रयोगशाळेने तयार केलेल्या अहवालात फेरफार करून वाडाला चुकीची माहिती दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हे केवळ रशियाचेच उदाहरण नाही तर भारताचा नवोदित क्रिकेटपटू पृथ्वी शॉ व पदकविजेती महिला बॉक्‍सर नीरजा यांना उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) दोषी आढळल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. यातून बोध घेत प्रत्येक देशाच्या, राज्याच्या तसेच स्थानिक क्रीडा संघटनांनी वाडाने कोणकोणत्या औषधांवर बंदी घातलेली आहे याची सखोल माहिती खेळाडूंना दिली पाहिजे.

अमित डोंगरे

Leave A Reply

Your email address will not be published.