रेल्वेने केल्या कोविड पश्‍चात बोगी

हातापेक्षा पायांचा वापर करण्याची सुविधा; तांब्याचे लेपन असल्यामुळे बोगी होणार अधिक सुरक्षित

नवी दिल्ली – कोविड-19 साथीचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या कपूरथला येथे असलेल्या बोगी निर्माण फॅक्‍टरीमध्ये कोविड साथीशी लढा देण्यासाठी सक्षम बोगी तयार करण्यात येत आहेत.

कोविडपश्‍चात वापरण्यास योग्य ठरतील असा बदल बोगींच्या रचनेमध्ये करण्यात आला आहे. दारांचे हॅंडल, लॅच यांच्यावर तांब्याचे लेपन करण्यात आले आहे. बोगीतली हवा शुद्ध करण्याची यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच या बोगींना टिटॅनियम डाय-ऑक्‍साईडचे लेपन करण्यात आले आहे.

प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेवून तयार करण्यात आलेल्या बोगींमध्ये हाताचा वापर न करता, पायाने पाण्याचा नळ सुरू करणे तसेच साबणाचे द्रावण घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच शौचकूपामध्ये प्रवेश करण्यासाठीही पायाने दरवाजा उघडता येणार आहे. त्याचबरोबर बोगीचा दरवाजा कोपराने ढकलून उघडता येईल, असा करण्यात आला आहे.

करोनाचा विषाणू तांब्यावर जास्त काळ राहू शकत नाही, हे लक्षात घेवून कोविडपश्‍चात बोगी तयार करताना सर्व हॅंडल्स आणि लॅचेसवर तांब्याचे लेपन करण्यात आले आहे. वातानुकूलित यंत्रणेच्या डक्‍टमध्ये प्लाझ्मा हवा शुद्धीकरणाची सुविधा आहे. त्यामुळे ही यंत्रणा वातानुकूलित बोगीच्या आतली हवा आणि बोगीच्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करू शकणार आहे. त्यामुळे कोविडचे विषाणू बोगीमध्ये राहू शकणार नाहीत.

बोगींना टिटॅनियम डाय-ऑक्‍साईडचे लेपन करण्यात आले आहे. या पर्यावरण स्नेही लेपनामुळे पृष्ठभागावर असलेल्या विषाणूंना, जीवाणूंना निकामी करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच हवाबंद डब्यामध्ये बुरशी जमा होण्याचे प्रमाण जास्त असते, ते या लेपनामुळे होणार नाही. टिटॅनियम डाय-ऑक्‍साईडच्या लेपनाला अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनानेही मान्यता दिलेली आहे. या लेपनाचा प्रभाव 12 महिने राहू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.