पनवेल – कुटुंबीयांसोबत ट्रेकिंगला गेलेल्या डॉक्टराचा पेब किल्ल्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला. मृत डॉक्टर रविवारी त्यांच्या कुटूंब आणि मित्रांसोबत पनवेलमधील पेब किल्ल्यावर ट्रेकींगसाठी गेले होते. परंतु, ट्रेकिंगदरम्यान युवा डॉक्टर बेपत्ता झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयानी ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलीस आणि शोध पथकांनी सह्याद्री ट्रेकर्स आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने डॉक्टरचा शोध घेतल्यानंतर संबंधित डॉक्टराचा मृतदेह किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला आहे.
डॉ. निखिल तन्नीर (वय, 24) असे मृत डॉक्टरांचे नाव आहे. निखिल हा कांदिवली येथील रहिवासी ते रविवारी त्याचे वडील किशोर तन्नीर (वय, 51) आणि आई सुनिता (वय, 47) आणि मित्रांसोबत पनवेलमधील पेब किल्ल्याचा ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंग ग्रुपमध्ये अंदाजे 10 जणांचा समावेश होता.
रविवारी संध्याकाळी त्यांनी किल्ल्यावरून उतरण्यास सुरुवात केली. डॉ. निखिल पुढे सरसावले तर त्यांचे आई-वडील मागे होते. मात्र, आई वडील पायथ्याला पोहोचले, तरीही निखिलचा काही थांगपत्ता लागला नाही. तसेच त्याने केलेल्या फोनलाही उत्तर दिले नाही. त्यामुळे तो कदाचित घरी गेला असेल असेल अशी त्यांची समजूत झाली.
“मृतांच्या पालकांनी थोडा वेळ त्याची वाट पाहिली आणि त्याचा मोबाइल बंद झाला असावा असे समजून ते घरी परतले. पण जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा तो घरात नव्हता. तसेच तो बेपत्ता आहे याची तक्रार नोंदवण्यासाठी कुटुंबाने एक दिवस वाट पाहिली व नंतर पोलीस स्टेशन गाठले,’ असे नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, बुधवारी सहा नेरळ पोलीस अधिकारी आणि सह्याद्री ट्रेकर्स आणि निसर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. दिवसभराच्या शोधानंतर त्यांना दरीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह डॉ. निखिलचा असल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झाले.