सातारा – किल्ले अजिंक्यतारा हा कायम अजिंक्य, अभेद्य राहिला आहे. या किल्याची आजही इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीना भुरळ पडते. शनिवारी नागपूर येथील शिवगौरव प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी किल्ले अजिंक्यताऱ्याला भेट दिली. नागपूर येथे दिवाळीनिमित्त किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. या निमित्ताने शिवगौरव प्रतिष्ठानतर्फे यावर्षी अजिंक्यताऱ्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर किल्ला पाहण्यासाठी प्रत्यक्ष आलेल्या प्रतिष्ठानच्या मावळ्यांना अजिंक्यतारा किल्ल्याविषयी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी माहिती दिली.
नागपूर येथील शिवदुर्ग प्रतिष्ठान गेली 15 वर्ष दिवाळीनिमित्त घेण्यात येणाऱ्या गड किल्ल्यांच्या प्रतिकृती स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेत त्यांनी यापूर्वी रायगड, तोरणा, राजगड, जंजिरा यासह अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. यावर्षी प्रथमच ते किल्ले अजिंक्यताराची प्रतिकृती साकारणार असून त्याबाबत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आपला मनोदय श्री. राजेशिर्के यांना बोलून दाखवला आणि प्रत्यक्ष किल्ले अजिंक्यतारा पाहूनच त्याची प्रतिकृती साकारू असे विचार मांडले.
त्यानिमत्ताने नागपूरचे शिवगौरव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राजधानी साताऱ्यात पोहोचले. त्यात रोहित लाड सावंगीकर, पीयूष भराटे, संजय नांदूरकर, अमय महाडिक, आदित्य खंडागळे, नितीन एरंडे यांचा सहभाग होता. त्यांचे स्वागत श्री. राजेशिर्के यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत जिज्ञासा मंचचे निलेश पंडितही उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना अजिंक्यतारा किल्ल्याची राजेशिर्के यांनी प्रत्यक्ष माहिती दिली. गडावरचा मुख्य दरवाजा, दक्षिण दरवाजा, गडावरील कोठार, राजसदर, महादेव मंदिर, मंगळाई मंदिर, कैद खाना याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच निलेश पंडित यांनी गडाच्या इतिहासकालीन नावाविषयी माहिती दिली. याबाबत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी श्री. राजेशिर्के यांचे आभार मानले.