“ब्लॉक’ इथले संपत नाही

रविवारी लोकलच्या 14 फेऱ्या, 2 पॅसेंजर रद्द

पिंपरी  – गेल्या कित्येक दिवसांपासून वारंवार रेल्वेकडून करण्यात येत असलेले ब्लॉक संपण्याचे नाव घेत नाहीत. हजारो प्रवाशांच्या अडचणीत वाढ करत रेल्वेने पुन्हा एकदा 9 जून रोजी ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या 14 लोकल फेऱ्या व 2 पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे व लोणावळा दरम्यान ऍटोमेटिक सिग्नलिंग प्रणाली बसवण्यासाठी व अन्य तांत्रिक कारणासाठी येत्या रविवारी (दि. 9) ब्लॉक घेण्यात येणार आहे.

यामुळे लोणावळ्यावरुन पुण्याकडे जाणाऱ्या 5, तळेगाव ते पुणे जाण्याऱ्या 2 अशा एकूण 7 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पुण्यावरुन लोणावळ्याच्या दिशेने धावणाऱ्या 7 लोकल अशा एकूण 14 लोकल फेऱ्या व पुणे ते पनवेल पॅसेंजरच्या जाणारी एक व येणारी एक फेरी रद्द करण्यात आली असून पुणे भुसावळ जाणारी व येणाऱ्या दोन एक्‍सप्रेसचे मार्ग बदलण्यात आहे.

वारंवार घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या सोमवारी (दि.3) 6 लोकलच्या फेऱ्या व दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचा मोठा त्रास पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना करावा लागला होता. पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने वारंवार होणाऱ्या ब्लॉकमुळे प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्‍त करीत आहेत. यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवास मार्गात बदल करावा लागत असल्याने कार्यालयाला पोहचण्यासाठी उशीर होत असून कार्यालयात लेट मार्क लागत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. कार्यालयीन वेळा वगळून रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, सर्वच कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा एक सारख्या नसल्याने रद्द करण्यात आलेल्या लोकल कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

लोणावळा ते पुणे रद्द केलेल्या लोकल
तळेगाव ते पुणे सकाळी 7:50, लोणावळा ते पुणे 8:20, तळेगाव ते पुणे 9:57, तर अन्य लोणावळा ते पुणे दरम्यान धावणाऱ्या 10:10, दुपारी 2:00, 2:50, 3:40 या वेळच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे ते लोणावळा रद्द केलेल्या लोकल
– सकाळी- 6:30, 6:50, 8:57, 11:20, 12:15, दुपारी 1:00, 3:00 वाजताच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पुणे पनवेल दरम्यान धावणारी सक़ाळची 9:5 मिनिटाची पैसेंजर व पनवेल वरुन पुण्याकडे धावणारी दुपारी 2:25 मिनिटाची पैसेंजर रद्द करण्यात आली आहे. तसेच भुसावळवरुन पुण्याला व पुण्यावरुन भूसावळला जाणारी एक्‍सप्रेस अनूक्रमे मनमाड दौंड व दौंड ते मनमाड असे मार्ग बदलण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.