चेन्नई- मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत पैसे उकळणाऱ्या नराधमाचा पीडित तरुणींनी मित्राच्या मदतीने काटा काढला आहे. आरोपीला पैसे घेण्यासाठी एका निर्मनुष्य ठिकाणी बोलावून त्याची हत्या करण्यात आली. प्रेमकुमार असे मयत तरुणाचे नाव असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
प्रेमकुमारने अनेक मुलींसोबत मैत्री केली होती आणि त्यांचे कथित अश्लील फोटोही काढले होते. याच फोटोंच्या आधारे तो मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. आतापर्यंत प्रेमकुमारला जवळपास दीड लाख रुपये दिल्याचे पीडित तरुणींचे म्हणणे आहे. मात्र तरीही तो शांत बसत नव्हता. वारंवार पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. यामुळे तरुणींनी प्रेमकुमारचा कायमचा काटा काढायचे ठरवले.
या तरुणींनी आपल्या इन्टाग्रामवरील एका मित्राची मदत घेतली. तरुणींनी आपल्या या मित्रासोबत मिळून प्रेमकुमारच्या हत्येचा प्लान केला. जेव्हा प्रेमकुमारने पुन्हा पैसे मागितले तेव्हा तरुणींनी त्याला निर्मनुष्य ठिकाणी पैसे घेण्यासाठी बोलावले. प्रेमकुमार आपल्या एका जोडीदारासोबत तेथे पैसे घेण्यासाठी आला असता.
आधीच दबा धरुन बसलेल्या गॅंगने त्याला घेरले आणि काही कळण्याच्या आत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून प्रेमकुमारचा साथीदार तेथून पळून गेला. या मारहाणीत प्रेमकुमारचा मृत्यू झाला. प्रेमकुमारच्या नातेवाईकांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलींच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.