मेलबर्न – इंग्लंड संघाच्या निराशाजनक कामगिरीला कर्णधार ज्यो रूट जबाबदार आहे. संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासह स्वतःच्या कामगिरीने संघाचे नेतृत्व करण्यात तो अपयशी ठरत आहे, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने टीका केली आहे.
ऍशेस कसोटी मालिकेतील इंग्लंडच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर पॉंटिंगने रूटवर ताशेरे ओढले आहेत. पहिले दोन कसोटी सामने गमावल्यावर रूटने आपल्याच संघातील गोलंदाजांवर टीका केली.
व्युहरचना प्रत्यक्षात आणणे, तिची अंमलबजावणी करणे हे संघाचा कर्णधार म्हणून रूटची जबाबदारी होती. त्यात अपयश आल्यावर त्याने संघातील गोलंदाजांवर टीका करणे योग्य नाही, असेही पॉंटिंगने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून दुसरी कसोटी 275 धावांनी गमावल्यानंतर इंग्लंड संघ या मालिकेत 2-0 असा पिछाडीवर पडला आहे. तू कर्णधार आहेस, गोलंदाजांना प्रेरित करू शकत नसल्यास या अपयशाची जबाबदारी कर्णधार म्हणून कोणाची आहे, असा सवालही त्याने रूटला केला.