बिहार – 24 तासांत दोघा तृतीयपंथीयांची हत्या करण्यात आल्याने अन्य तृतीयपंथीयांनी बिहारच्या पाटण्यात रास्तारोको केला. यातील एका तृतीयपंथीची मंगळवारी सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सखोल चौकशी करुन तातडीने आरोपींना अटक केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाटण्याच्या कंकडबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हत्या झाली. सनी नावाचा एक तृतीयपंथी सकाळी जखमी अवस्थेत एका पुलाखाली पडल्याचे आढळून आले होते. त्याला रुग्णालात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर तृतीयपंथी समाजाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. यावेळी करण्यात आलेल्या निदर्शानाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता.
छातीत गोळी घालून एका तृतीयपंथीचा जीव घेण्यात आल्यानंतर तृतीयपंथी समाज आक्रमक झाला होता. या हत्येप्रकरणी एकाला ताब्यातही घेण्यात आले असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, आता पाटण्यातील कंकडबाग परिसरात तणावपूर्ण वातावरण असून तृतीयपंथीवर लाठीचार्ज केल्याने तणाव आणखी वाढला. यावेळी जाळपोळ, दगडफेक आणि जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे.