गणेगाव दुमाला येथील घटना : मांडवगणमध्ये उपचार
मांडवगण फराटा – शेतात काम करताना एकास विषारी सापाने दंश केला. मात्र, त्यानंतर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. ही घटना गणेगाव दुमाला येथे घडली.
गणेगाव दुमाला येथील पंडित दिंगबर इंगळे (वय 55) या शेतकऱ्याला शेतात काम करीत असताना घोणसने त्यांच्या उजव्या हाताला दंश केला होता. यावेळी त्यांना काहीतरी हाताला चावल्याचे जाणवले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी रुग्णाची लक्षणे पाहून डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.
दरम्यान, त्यांना उपचारासाठी लागणारे इंजेक्शन (लस) मिळणे गरजेचे होते. यावेळी त्यांनी धावपळ करून शिरूर व दौंड तालुक्यातून लागणाऱ्या उपचारासाठी लस उपलब्ध केली. यावेळी डॉक्टरांनी सातत्याने रुग्णाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून उपचार केले.
डॉक्टरांनी पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार केले. या दरम्यान 74 लसीची मात्रा रुग्णाला देण्यात आली. त्यानंतर रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढला. रुग्णाला वाचविण्यासाठी डॉ. निलेश कटकदौंर, डॉ. मनोज भोसले, डॉ. सुनील पवार, डॉ. अजित गरड, डॉ. अभय घोडके यांच्यासह स्टाफने विशेष मेहनत घेतली. रुग्णाचा मुलगा राहुल व नातेवाईकांनी लस मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शेतकरी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला.
दरम्यान, इनामगाव येथील छाया मचाले यांना देखील सर्पदंश झाला होता. परिसरात दोन दिवसांत सर्पदंशाची ही दुसरी घटना आहे. शेतकऱ्यांनी सर्पदंश झाल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा सातपुते यांनी केले आहे.
खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न
डॉ. सुनील पवार म्हणाले की, गणेगाव येथील रुग्णाला सर्पदंश चावल्यानंतर त्वरित रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी विषारी सापाचा दंश असल्याने रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती. पण वेळेत निदान व उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.