सातारा – सातारा पालिकेच्या 13 जागांची ओबीसी आरक्षण सोडत प्रक्रिया गुरुवारी दि. 28 रोजी सायंकाळी चार वाजता शाहू कलामंदिरात होणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या सोडत प्रक्रियेमध्ये खुल्या गटातील अनेक उमेदवारांचे पत्ते कट होण्याची शक्यता असल्याने या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण सातारा शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा पालिकेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या सोडतीमध्ये 18 प्रभागांसाठी आरक्षण आणि सात प्रभागांसाठी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण या पद्धतीची आरक्षण रचना झाली होती. यामध्ये न्यायालयाचा निर्णय झाला नसल्याने 13 जागांचे आरक्षण खुल्या प्रवर्गात हस्तांतरित झाले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्चा न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 54 जागांची ओबीसी आरक्षण सोडत प्रक्रिया गुरूवारी दि. 28 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सातारा, मेढा, पाचगणी, महाबळेश्वर या चार स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण काढले जाणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षणसुद्धा गुरुवारी सकाळी 11 वाजता काढले जाणार आहे.
सातारा पालिकेच्या 13 जागांचे आरक्षण सोडत गुरुवारी चार वाजता प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत काढली जाईल. ही सोडत अनुसूचित जाती जमातीचे सात प्रभाग वगळून खुल्या 18 प्रभागांत 13 ओबीसी जागांचे आरक्षण टाकले जाणार आहे. यामध्ये पहिल्यांदा प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून कोणत्या प्रभागांत ओबीसी आरक्षण पडेल, हे सोडतीद्वारे निश्चित होईल. त्यानंतर 50 टक्के महिला आरक्षण याप्रमाणे सात ओबीसी महिला जागांची आरक्षण सोडत काढली जाईल.
उरलेल्या सहा जागा या ओबीसी सर्वसाधारण जागेसाठी असतील. नगरसेवकांच्या संख्यानिहाय विचार केला तर तीस नगरसेवक खुल्या गटातील, तेरा नगरसेवक इतर मागास प्रवर्गातील आणि सात नगरसेवक अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील निवडले जाणार आहेत. या ओबीसी आरक्षण सोडतीमध्ये बऱ्याच खुल्या जागातील उमेदवारांचे पत्ते कापले जाणार असल्याने त्यांच्या पोटात गोळा आला आहे. यामध्ये खुल्या गटात माजी नगरसेवक वसंत लेवे, अमोल मोहिते, शेखर मोरे पाटील, अविनाश कदम अशी दिग्गज नावे असल्याने आरक्षण सोडतीनंतरच कोणाचा पत्ता सेफ होणार किंवा कोणाचा कापला जाणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही सोडत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.