मुंबई – मुंबईच्या मुलुंडमध्ये एका महिलेने आपल्याच पोटच्या 39 दिवसांच्या बाळाला इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. हे बाळ खाली फेकल्यानंतर एका दुकानावर पडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उजेडात आला.
अधिक वृत्तानुसार मुलुंड येथील निळकंठ अपार्टमध्ये ही घटना घडली. मनाली मेहता असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती सुरतहून मुलुंड स्थित आपल्या माहेरी आली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. मनालीच्या बाळावर तिच्या वडिलांचा फार जीव होता. त्यामुळे या बाळाला पाहताच तिला तिच्या वडिलांची आठवण येत होती.
यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. आपल्या बाळाला त्याचे आजोबा बोलावत असल्याचे ती कुटुंबातील इतर सदस्यांना सांगत होती. त्यावर तिचे कुटुंबीय तिची समजूत काढत होते. पण गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास मनालीने अचानक 14 व्या मजल्यावरील आपल्या बेडरूमची खिडकी उघडली आणि आपल्या बाळाला खाली फेकून दिले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इमारतीतील एका रहिवाशाला दुकानाच्या छतावर एका लहान मुलीचा मृतदेह पडल्याचे दिसले. त्याने ती बाब पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. त्यात हे बाळ मनाली मेहताचे असल्याचे स्पष्ट झाले.
तणावातून केले कृत्य
वडिलांच्या मृत्यूनंतर मनाली मानसिक तणावाखाली होती. त्यातून तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचीही माहिती मिळाली आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे मनालीचे पहिल्या बाळाचा 8 महिन्यांतच म्ृत्यू झाला होता. त्यानंतर वडिलांचे आणि आता तिच्या दुसऱ्या बाळाचेही निधन झाले आहे.