पुणे – पुण्यातील कात्रज, भिलारेवाडी परिसरातील जनसेवा फौंडेशनच्या निराधार मुला – मुलींच्या पुनर्वसन केंद्रात लहानाची मोठी झालेल्या पूनम संजय खाटपे या निराधार मुलीचा विवाह करून कन्यादान करण्यात आले. पूनमचा विवाह वडकी येथील तुषार हरिभाई मोडक याच्यासोबत पार पडला. पूनम ही अगदी लहानपणापासून, २-३ वर्षाची असल्यापासून या निराधार पुनर्वसन केंद्रात होती. फौंडेशनने तिचे १० वी, १२ वी आणि नंतर नर्सिंग असे शिक्षण केले. या निराधार मुलीचा मोडक कुटुंबीयांनी स्वीकार केला. त्याबद्दल जनसेवा फौंडेशनला मोडक कुटुंबीयांविषयी कायम आदर वाटेल अशी भावना जनसेवा फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
जनसेवा फौंडेशनतर्फे नेहेमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. जेष्ठ नागरिक, वंचित, निराधार इ. साठी कार्य करीत आहे. भिक्षेकरी मुलांसाठी विशेष प्रकल्प राबवित आहे. यामध्ये त्यांचे शिक्षण, आरोग्य सांस्कृतिक विकास इ. वर विशेष भर देण्यात येत आहे. वृद्धाश्रम, ग्रामीण रुग्णालय, ग्रामविकास, फिरते रुग्णालय, इ. प्रकल्प ठळकपणे राबविले जातात. तसेच अनेक अनाथ मुले, मुली, जेष्ठ नागरिक यांना वैयक्तिक मदत केली जाते. याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या निराधार मुलीचे लग्न करून देण्यात आले.
या प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, प्रकल्प प्रमुख सौ. मिना शहा, विश्वस्त सौ. कैलाश पटेल, डॉ राजन पटेल, विश्वस्त श्री नानजीभाई शहा, जनसेवा फौंडेशनचे विश्वस्त,कोठारी व्हील्सचे श्री राजेंद्र कोठारी, सौ. चंचला शशिकांत कोठारी, पोलीस अधिकारी श्री सुरेशराव मिरगे, तसेच सरस्वती अनाथआश्रम, वाघोली येथील श्री शिवलालजी जाधव इ. मान्यवर उपस्थित होते. डॉ. विद्युत पटेल व सौ. बीना पटेल यांनी संस्थेच्या वतीने कन्यादान केले. सौ. कैलाश पटेल यांनी हा विवाह जुळविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.
संस्थेचे विश्वस्त प्रा. जे. पी. देसाई यांनी सर्व निमंत्रितांचे स्वागत केले. सहभोजनाचा आस्वाद घेऊन हा सुंदर विवाह सोहळा संपन्न झाला. अशी माहिती जनसेवा फाऊंडेशनचे खजिनदार राजेश शहा यांनी दिली.