निमसाखर- इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टयांमध्ये खरीपातील अन्य पिकांबरोबरच बाजरीचे पिक जोमात आले आहे. त्यामुळे बाजरीची पाखरांपासून राखण करण्यासाठी हुर्रर्र…हुर्रर्र…..अशी आरोळी परिसरात घुमत आहे. निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी, शिरसटवाडी आदी परिसरात खरिपातील बाजरी पिकाचे उत्पादन घेतले आहे.
या भागात पूर्वीही मोठ्या प्रमाणात बाजरीचे पिक घेतले जात होते. मात्र, कालांतराने उसासोबतच डाळींब, पेरु, मोसंबी आदी फळबागाकडे परिसरातील शेतकरी वळाला आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा बाजरी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तरी खरीप हंगामात धान्यांसोबतच जनावरांना चारा देणारे पिक म्हणून उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटत असल्याने शेतकरी बाजरी लागवडीकडे वळत आहे. सध्या बाजरी पोसावली आहे. बाजरी दाण्यांनी भरल्यामुळे पक्षांचा चिवचिवाट शिवारात घुमत आहे. भल्या पहाटेच शेतकरी शिवारात जात आहे.