तत्वांची लढाई आता निर्णायक स्थितीत पोहचली – मनमोहन वैद्य

नागपुर: नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक ही हिंदु जीवन पद्धती आणि विभाजनवादी राजकीय विचारधारा या दोन राजकीय विचारधारांमधील लढाई होती. ती आता निर्णायक स्थितीत पोचली आहे अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. भाजपला मिळालेल्या भरघोष यशाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली असली तरी त्यांनी त्यात भाजपचे नाव घेतलेले नाही.

ते म्हणाले की या दोन तत्वांमधील ही लढाई स्वातंत्र्य काळापासून सुरू आहे. ती आता निर्णायक पातळीवर पोचली आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी म्हटले आहे की, हा भारताच्या उज्जवल भवितव्यासाठी जल्लोषाचा दिवस आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की भारताची प्राचीन मुल्ये, आणि सर्वसमावेशक विचार प्रक्रिया यावर हिंदु जीवन पद्धती अवलंबून आहे. या जीवन पद्धतीची एक विचारधारा आणि दुसरीकडे जात, भाषा, राज्ये, आणि धर्माच्या आधारावर समाजाची स्वार्थीपणाने विभाजन करणारी विचारधारा या दोन विचारधारांमधील ही लढाई होती. हिंदु जीवन पद्धतीच्या विचारधारेने समाजाच्या ऐक्‍याचा आणि हिताचा विचार सातत्याने केला पण दुसऱ्या विचारधारेने कायमच याचा विरोध केला. या निवडणुकीने या लढाईत एक महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे. भाजपचे नाव न घेता त्यांनी सशक्त नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे या तत्वाच्या यशस्वी लढाईतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.