न्हावरे(प्रतिनिधी) :- न्हावरे ( ता.शिरूर ) परिसरातील कोकडेवाडी येथे पेरणीच्या कामासाठी आठ दिवसांपूर्वी आलेल्या व मूळच्या कोंढवा (पुणे) येथील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय महिलेचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोकडेवाडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कोकडेवाडी येथे कोंढवा येथून एक ५५ वर्षीय महिला पतीसह शेतातील पेरणीच्या कामासाठी १२ जूनला आली होती. दरम्यानच्या काळात या महिलेने आपला मुक्काम कोकडेवाडी येथील नातलगांच्या घरी केला होता. ही महिला परत कोंढवा येथील आपल्या घरी गेल्यानंतर तिच्या कोंढवा येथे राहणाऱ्या पुतण्याचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित महिलेची करोना तपासणी केली असता, तिचा अहवाल देखील (दि.२०) पॉझिटिव्ह आला आहे. याच महिलेच्या कोकडेवाडी येथील दोन नातलगांनी तिच्या कोंढवा येथील घरी एक दिवस मुक्काम केल्यामुळे प्रशासनाची काहीशी डोकेदुखी वाढली आहे.
संबधित महिलेचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजताच न्हावरे येथील ग्रामप्रशासन व आरोग्य विभागाची यंत्रणा संतर्क झाली असून, या महिलेच्या कोकडेवाडी येथे संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या दहा व्यक्तींचे घशातील द्रव (Swab) मंगळवारी (दि.२३) तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.असे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांंचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सरपंच मंदा शेंडगे व ग्रामविकास अधिकारी पी.सी.केदारी यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.