लोणी काळभोर, (वार्ताहर)– विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबर कुठली तरी एक कला आत्मसात केली पाहिजे. कारण कला ही माणसाला सामाजिकरित्या जिवंत ठेवते. कलेच्या सहवासामुळे खऱ्या अर्थाने माणूस घडतो आणि त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त एक आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा व संधी प्राप्त होते, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या सहाव्या ‘पर्सोना फेस्ट-२४’ च्या उदघाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरू, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डाॅ. मंगेश कराड, एमआयटी मिटकाॅमच्या कार्यकारी संचालक प्रा. डाॅ. सुनिता कराड, प्र कुलगुरू डाॅ. अनंत चक्रदेव, डाॅ. रामचंद्र पुजेरी, डाॅ. मोहित दुबे, कुलसचिव डाॅ. महेश चोपडे, डाॅ. विरेंद्र शेटे, डाॅ. रजनीश कौर सचदेव-बेदी, डाॅ. नचिकेत ठाकूर, डाॅ. मिलिंद ढोबळे उपस्थित होते.
कुलकर्णी यांनी आपल्या आवाजात ‘शिववंदना’ सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये प्रचंड जोश संचारला होता. अभिनेत्री रिंकूने यावेळी सैराट चित्रपटातील तिचा प्रसिद्ध डायलाॅग म्हणून उपस्थितांची मने जिंकली.
प्रा. डाॅ. कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्यातील कलाकार, गायक, चित्रकार, कवी आदी आवडी-निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यामाध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पर्सोना फेस्टचे दरवर्षी आयोजन केले जाते. पुढील चार दिवस चालणाऱ्या या कला उत्सवासाठी अभिनेता आदिनाथ कोठारे, अंकुश चौधरी व स्टॅन्डअप विनोदवीर गौरव कपूरसह अनेक सेलिब्रेटी विद्यापीठात हजेरी लावणार आहेत.