भूत बंगल्यासारखे वातावरण : अनेक साहित्यांची चोरी
पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे गर्दुले, भुरटे चोर, मद्यपींचे अड्डे
– संजय कडू
पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा “ड्रीम सिटी’ हा महत्वकांक्षी प्रकल्प होता. फुरसुंगीजवळ कदमवाक वस्तीशेजारी हा प्रकल्प आकार घेत होता. चार आलिशान इमारतींत महाविद्यालय आणि कॅम्पसचे काम पूर्ण झाले होते.
परंतू, गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी डीएसकेंना अटक झाल्यानंतर हा प्रकल्प अडचणीत आला. यानंतर महाविद्यालय इमारतींना आता भूतबंगल्याचे स्वरुप आले. मागील काही महिन्यांत दरवाजे, कपाट, खुर्च्या, वाहने, एसी, वॉटर प्युरिफायर्स, इलक्ट्रिकल युनिट्स, सीसीटीव्ही, टेलिव्हिजन सेट, संगणक, वाहने, ऍल्युमिनियम प्लेट्स चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. इमारतीत सर्वत्र काचांचा खच पडला आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता, डीएसके इंटरनॅशनल कॉलेज ऑफ डिझाइनची अवस्था पडीक शहरासारखी झाली आहे. इमारतीची लचकेतोड होऊन ती उद्ध्वस्त झाली आहे.
येथे सुरक्षारक्षक, पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे गर्दुले, भुरटे चोर, मद्यपींचे चांगलेच फावले आहे. मध्यंतरी वाहने भरुन येथील किंमती वस्तू नेण्यात आल्या. काही भंगार व्यावसायिकांनीही “हात मारला’. तर स्थानिक गुन्हेगारांचा येथे नियमीत अड्डा झाला आहे. ड्रीम सिटीच्या पहिल्या टप्प्यात या चार इमारती बांधण्यात आल्या. दोन इमारती विद्यार्थी-शिक्षकांसाठी हॉस्टेल्स आहेत. तर दोन इमारती या महाविद्यालयच्या आहेत. शिवाय दोन प्रशस्त मैदाने आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार “ड्रीम सिटी परिसर 2017 मध्ये पोलिसांनी पूर्णपणे सील केला होता.
या परिसरात कोणालाही जाण्याची परवानगी नाही. या ड्रीम सीटीत प्रवेश करता येऊ नये, म्हणून तेथे खंदक खोदण्यात आले.’ मात्र, आता यातील एक खंदक बुजवून अगदी फोर व्हिलरही आतपर्यंत जात आहेत. प्रवेशद्वारावरील केबिनचीही तोडफोड करण्यात आली आहे. येथील गार्डनला वाळवंटाचे स्वरुप आले आहे. येथे प्रत्यक्ष भेट दिली असता, हडपसर पोलीस ठाण्यातील मार्शलने चोरी करताना काही तरुणांना पकडले होते.
23 एप्रिल 2020 रोजी चोरट्यांनी वर्गखोल्यांचे दरवाजे व खिडक्या चोरल्या. शिवाय एसी, पंखे, दूरदर्शन संच, कपाट, टेबल्स, खुर्च्या, संगणक, सीसीटीव्ही युनिट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही पळवली. कॅन्टिन परिसरातून स्वयंपाकाची युनिट, रेफ्रिजरेटर व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरली. संशयितांनी आवारातून 10 वाहनेही चोरून नेली. एकत्रितपणे, चोरट्यांनी आवारातून 1 कोटी रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी तपास सुरू आहे.
– पोलीस अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा
“येथील बंद इमारतीमुळे गुन्हेगार व्यक्तींचा दिवसरात्र वावर वाढला आहे. यामुळे आम्ही भीतीच्या सावटाखाली आहोत. पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवावा.’
– स्थानिक नागरिक, कदमवाक वस्ती
डीएसके ड्रीम सिटीतील चोरीचे तीन गुन्हे आतापर्यंत आम्ही दाखल केले आहेत. हा मोठा परिसर असल्याने पोलीस 24 तास लक्ष ठेऊ शकत नाहीत. मात्र, बीट मार्शल्स नियमितपणे या भागात भेट देतात आणि गुन्हेगारांवर लक्ष ठेवतात.
– बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर
स्थानिक पोलिसांसह डीएसके ड्रीम सिटी परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल. तसेच प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल
– भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे