पाचगणी (प्रतिनिधी) – शनिवारी पाचगणी येथील सिध्दार्थनगरमधील 68 वर्षाची महिला करोनाने मृत्युमुखी पडल्याने महाबळेश्वर तालुक्यातही करोनाचा प्रवेश झाला आहे. या घटनेने पाचगणी शहरात खळबळ उडाली असून पाचगणीकराच्यात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, “पाचगणीकरांनो आलाय दारात करोना, आता तरी बसा घरात’ अशी असे आवाहन करण्यात येत आहे.
पाचगणी येथे करोनामुळे मृत्यू झालेली ही महिला मुबईहुन गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रवास करून पाचगणीतील सिद्धार्थनगर येथे आली होती. मुबई-वरळी येथून दि.16 मे रोजी पाचगणीमध्ये तिला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. आरोग्य विभागाचे अधिकारी रोज तिची नित्य तपासणी करीत होते. पण त्यांना तिच्यामध्ये कोणतीही करोना सदृश्य लक्षणे आढळून आली नव्हती. परंतु या महिलेला दमा, मधुमेह, रक्तदाब, हे आजार होते. या मृत महिलेचा स्वॅब वाई येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात घेतला होता. तिच्यावर अंत्यविधी पाचगणी येथे करण्यात आले तसेच या महिलेच्या अति संपर्कात आलेले 11 जणांची स्वॅब घेतले आहेत, तर 34 जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाइन करण्यात आले आहे. सिध्दार्थनगर कंटनमेंट झोन म्हणून घोषित केले असून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.