पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदीवर सांगवी येथील दत्त आश्रम मठ ते बोपोडीतील चंद्रमणी नगर दरम्यान पुलाचे काम सुरू आहे. हा पुल जानेवारीत वाहतुकीस सुरू करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. जानेवारी ऊलटूनही अद्याप पुलाचे काम रखडलेलेच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पुणे, औंध आदीसह विविध परिसरात जाण्यासाठी लांबचा प्रवास काही काळ करावा लागणार आहे.
सांगवी येथील स्पायसर महाविद्यालयास जोडणार्या मुळा नदीवरील पूल अरूंद आहे. या एक पदरी पुलावर वारंवार वाहतूक कोंडी होते. हे टाळण्यासाठी महापालिकेने सांगवी ते बोपोडी असा नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सांगवीतील ममतानगर येथील दत्त आश्रम मठापासून पुणे विद्यापीठामागील चंद्रमणी नगरच्या शेजारच्या कृषी महाविद्यालयाच्या जागेत पूल उभारण्यात येत आहे. या पूलामुळे बोपोडी, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, खडकी, औंध रस्ता या दिशेला ये-जा करणे. पुण्यातून सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव या भागात जाणे सुलभ होणार आहे. स्पायसर महाविद्यालय रस्त्यावर असलेला सध्याचा मुळा नदीवरील पूल एक पदरी असून, दोन्हीकडील जोडमार्ग अरूंद आहेत. त्यामुळे वर्दळीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. त्या पुलास हा नवा पूल पर्यायी ठरणार आहे.
हा पूल वेळेत सुरू केल्यास नागरिकांची वळसा घालून जाण्याची गैरसोय टळणार आहे. मात्र, पुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. सध्या ७० टक्के काम झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उर्वरीत काम पूर्ण करून हा पूल वाहतुकीस कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
2021 मध्ये ४१ कोटी ६३ लाखाला मंजुरी
पूल 760 मीटर लांबीचा दोन पदरी आहे. त्यांची रुंदी 18.60 मीटर आहे. सांगवीच्या बाजूने 80 मीटर व पुण्याच्या बाजूस 555 मीटरचा पोहोच रस्ता आहे. पुलावर पदपथ असून, एकूण 6 पिलर उभारले जाणार आहेत. पुलासाठी 41 कोटी 63 लाख खर्चास स्थायी समितीने 11 सप्टेंबर 2021 ला मंजुरी दिली आहे. पिलर उभारणीचे 90 टक्के काम झाले आहे. पुलाचे एकूण 70 टक्के काम झाले आहे. कामाची मुदत दोन वर्षे आहे. नव्या वर्षांत जानेवारी महिन्यात पूल 100 टक्के तयार होईल, असे महापालिकेचे नियोजन होते. मात्र, अद्याप त्याला यश आले नाही.