नगर – जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आपण उपोषण करूनही आपल्याला अधिकाऱ्यांकडून उत्तरे अहवाल नाही आला असा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी उपस्थित केला होता. त्याच वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी माझ्यावर झालेल्या आरोपासंदर्भात खुलासा करावा, असा मुद्दा उपस्थित करून सभागृहाकडून उत्तर मागितले. हा कलगीतुरा सुरु होत असतानाच राष्ट्रगीत सुरु करण्यात आल्यामुळे तूर्त या वादावर पडदा पडला आहे.
अकोले तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व गटविकास अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करून जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी चौकशीची मागणीसाठी उपोषण केले होते. आपल्याला चौकशी अहवाल मिळाले नाही, असा मुद्दा दराडे यांनी विशेष सर्वसाधारण उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष राजश्री घुले यांनी ही विशेष सभा आहे.
तुमचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित करा, तसेच यावर आपण नंतर चर्चा करून असे सांगून दराडे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. याच वेळी शालिनी विखे यांनी माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सभागृहात केली. विखे यांचा हाच धागा पकडून जिल्हा परिषद राजेश परजणे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली.
याच वेळी राष्ट्रगीत सुरु करण्यात आले. त्यामुळे या मुद्द्यावर तूर्ततरी पडदा पडलेला आहे. राष्ट्रगीत अध्यक्षांची परवानगी नसताना सुरु करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी विखे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, राजेश परजणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सभा संपल्यानंतर केली. या वेळी संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून घेतले असून त्याने सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त केलेली आहे.