फी वाढ मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही

जेएनयु विद्यार्थ्यांची भूमिका
केंद्रीय समितीशी चर्चेची प्रक्रिया पुर्ण
नवी दिल्ली : जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या उच्च स्तरीय शिष्टमंडळाने जेएनयुतील विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेची प्रक्रिया पुर्ण केली आहे, काल त्यांनी आपली चर्चा पुर्ण केली असून ते आता आपल्या शिफारशी विद्यापीठातील प्रशासनाला सादर करतील आणि विद्यापीठाचे प्रशासनच त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे.

जो पर्यंत वसतीगृहाची वाढीव फी मागे घेतली जात नाही तो पर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका या विद्यार्थी संघटनेने घेतली आहे. ज्या समितीने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. सी. चौहान यांनी केले.

या शिष्टमंडळात रजनीश जैन, अनिल सहस्त्रबुद्धे यांचाही समावेश होता. या संबंधात बोलताना रजनीश जैन म्हणाले की आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चेची प्रक्रिया पुर्ण केली असून आता आम्हाला त्यांचे नेमके म्हणणे समजले आहे, त्यामुळे यापुढे आम्हाला आणखी चर्चेची गरज भासणार नाही. आता आम्ही आमच्या शिफारशी विद्यापीठाच्या प्रशासनाला करणार आहोत आणि पुढील निर्णय तेच घेणार आहेत.

जेएनयु विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ऐषे घोष यांनी सांगितले की फी वाढ पुर्ण मागे घेणे हीच आमची प्रमुख मागणी असून त्यावर तडजोड केली जाणार नाही. आणि जो पर्यंत ही मागणी मान्य केली जात नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. या आधी विद्यापीठाने फी वाढ 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याची घोषणा केली होती पण ती फसवी होती असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. केवळ दारिद्र रेषेखालील विद्यार्थ्यांचीच फी 50 टक्‍क्‍यांनी कमी केली जाईल अशी अट त्यात होती असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.