श्रीनिवास औंधकर
मानवाला राहण्यायोग्य ठरू शकतो, असा एक ग्रह नासाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. मानवी संस्कृतीचे अस्तित्व टिकविण्यासाठी पृथ्वीव्यतिरिक्त राहण्यायोग्य ग्रहाचा शोध घेणे आवश्यक आहे, असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग नेहमी म्हणत असत.
जीवनाच्या अस्तित्वासाठी ब्रह्मांडात सर्वाधिक अनुकूल ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. पण शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करून परग्रहावरही जीवनाच्या शक्यता सातत्याने पडताळून पाहत आहेत. पृथ्वीएवढ्या आकाराच्या बर्फाळ ग्रहांवर मानवी अस्तित्वाला पोषक वातावरण असू शकते, असा दावा एका नव्या संशोधनाच्या आधारे आता करण्यात आला आहे. पृथ्वीसारख्या आकाराच्या, गोठून बर्फ झालेल्या ग्रहांवर जीवनाला पोषक वातावरण असण्याची शक्यताच नाही, असे शास्त्रज्ञ आजवर मानत होते. कारण या ग्रहांवरील महासागर गोठून गेले आहेत आणि अत्यधिक थंड हवामानही जीवनाची शक्यता नष्ट करते.
परंतु अत्यधिक थंड वा अत्यधिक उष्ण ग्रहांवर जीवनाची शक्यता नाही, या समजुतीला नव्या संशोधनाने छेद दिला आहे. जिओफिजिकल रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अध्ययनाच्या अहवालानुसार, बर्फाळ ग्रहांच्या भूमध्य रेषेच्या आसपासची ठिकाणे राहण्यायोग्य तापमान अस्तित्वात असू शकते. कॅनडातील टोरांटो विद्यापीठातील खगोल आणि भौतिकविज्ञान विषयाचे शास्त्रज्ञ एडिव्ह पॅराडाइज सांगितले की, आम्हाला संशोधनात काही असे ग्रह आढळले आहेत, जे बर्फाळ आहेत. पारंपरिक समजुतींनुसार असे ग्रह राहण्यायोग्य मानले जात नसत; परंतु नवे संशोधन असे सांगते की, कदाचित हे ग्रह राहण्यायोग्य असूही शकतात.
संशोधकांनी सांगितले की, राहण्यायोग्य क्षेत्रे ताऱ्यापासून असलेल्या अंतरावर अवलंबून असतात. ताऱ्यापासून विशिष्ट अंतरावर असल्यामुळे तेथे तापमान सामान्य आणि पाणी द्रवरूपात अस्तित्वात असू शकते. आपल्या पृथ्वीवरही यापूर्वी दोन ते तीन वेळा हिमयुग अवतरून गेले आहे. मात्र, तरीही येथे जीवनाचे अंश टिकून राहिले, असे आतापर्यंतच्या अभ्यासातून पुढे आले आहे. हिमयुगात सूक्ष्म जीव बचावले. पॅरडाइज यांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी हिमयुगादरम्यानही राहण्यायोग्य होती. हिमयुगाच्या आधीच इथे जीवनाचा प्रारंभ झालेला होता. हे जीवन हिमयुगादरम्यान आणि नंतरही कायम राहिले. बर्फाळ ग्रहांवर राहण्यायोग्य कारणांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी संगणकाच्या प्रोग्रामचा आधार घेतला.
या प्रोग्राममध्ये सूर्यप्रकाशाचे अस्तित्व आणि क्षेत्रे यांच्या आधारावर मॉडेल तयार करण्यात आली. ज्या गोष्टीकडे शास्त्रज्ञांनी सर्वाधिक लक्ष दिले, ती कार्बन डाय ऑक्साइड हीच होती. कार्बन डाय ऑक्साइडच्या अस्तित्वामुळेच ग्रहांवर उष्णता निर्माण होते आणि जलवायू परिवर्तनही होते. या वायूविना ग्रहांवरील महासागर गोठून जातात.
वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड कमी झाल्यास ग्रह बर्फाळ (स्नोबॉल) बनतात. परंतु जेव्हा या ग्रहांवर सूर्याचा प्रकाश पडतो, तेव्हा त्या ग्रहांच्या भूमध्य रेषेच्या आसपास पाणी तयार होण्याची शक्यता निर्माण होते. बर्फाळ ग्रहांवरही जीवनाचे अंश असू शकतात, असा दावा याच आधारावर केला गेला आहे.
नासाच्या शास्त्रज्ञांनी नुकताच असा एक ग्रह शोधून काढला आहे, जो राहण्यायोग्य असू शकतो. हा ग्रह आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील आहे. आपल्या पृथ्वीपासून तो सुमारे 31 प्रकाशवर्ष दूर आहे. या सुपरअर्थ ग्रहाला जीजे 357-डी असे नाव देण्यात आले आहे. ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट या नासाच्या दुर्बिणीने या ग्रहाचा शोध या वर्षाच्या सुरुवातीस लावला होता. अमेरिकेच्या कार्नेल विद्यापीठात याविषयी संशोधन करणाऱ्या पथकातील सदस्या लिसा कलटेनेगर यांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीपासून सर्वांत जवळ सुपरअर्थचा शोध लागला, ही अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक गोष्ट आहे. हा ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा मोठा आहे. या ग्रहाभोवती दाट वातावरण पाहायला मिळाले आहे आणि या ग्रहाच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणेच पाणी द्रवरूपात असण्याची शक्यता आहे. दुर्बिणीच्या मदतीने या ग्रहावर जीवनाचे संकेत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (टीईएसएस) हा उपग्रह नासाने ग्रहांच्या शोधासाठी गेल्या वर्षी 18 एप्रिल रोजी प्रक्षेपित केला होता. तो दोन वर्षे कार्यरत राहणार आहे. स्पेनच्या इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स ऑफ द कॅनरी आयलॅंड आणि युनिव्हर्सिटी ऑफ ला लागुनाच्या खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, त्यांनी जीजे 357 मालिकेचा शोध लावला आहे. या मालेत एकूण तीन ग्रह आहेत. यातील एका ग्रहावर (जीजे 357-डी) राहण्यायोग्य परिस्थिती असू शकते. याखेरीज या मालिकेत जीजे 357 हा एक छोटा ग्रहसुद्धा आहे आणि तो सूर्यापेक्षा एकतृतीयांश आकाराचा आहे.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये टीईएसएसने असा शोध लावला की जीजे-357 हा ग्रह दर 3.9 दिवसांनी थोडा-थोडा मंद होत आहे. या ग्रहाभोवती अन्य एक ग्रह परिक्रमा करीत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या मते, हा ग्रह जीजे 357-बी हा होता आणि तो पृथ्वीपेक्षा आकाराने 22 टक्क्यांनी मोठा आहे.
पृथ्वीशी मिळतेजुळते असलेल्या अनेक ग्रहांवर माणूस जीवन जगू शकतो. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, ग्रह राहण्यायोग्य आहेत की नाहीत, याचा शोध लागणे हे खगोलविज्ञानाच्या दृष्टीने मोठे यश आहे.