नवी दिल्ली – काही मूठभर डावे आहेत ज्यामुळे विख्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (JNU ) हुशार विद्यार्थ्यांची बदनामी होत आहे. फक्त तुम्ही जेएनयुचे विद्यार्थीच त्यांना पराभूत करू शकता आणि तुमच्या चांगल्या कृतींनी जेएनयुचा लौकीक वाढवू शकता. आता जेएनयूने उदयोन्मुख राष्ट्रवादी आणि राष्ट्रनिर्माते दिले आहेत जे आता देशाला महासत्ता बनवत आहेत, अशा शब्दांत विख्यात दिग्दर्शक सुदीप्तो सेन (sudipto sen) यांनी जेएनयुबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित बस्तर द नक्सल स्टोरी (Bastar: The Naxal Story) या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सेन यांचा लव्ह जिहादवर आधारित केरळ स्टोरी बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर त्यांच्या दिग्दर्शनाखाली बस्तर द नक्सल स्टोरी नावाचा आणखी एक चित्रपट येत आहे.
या चित्रपटातही केरळ स्टोरीची अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. निर्माता विपुल अमृतलाल शाह, अदा शर्मा आणि सुदीप्तो सेन यांच्या उपस्थितीत जेएनयूमध्ये नव्या सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय कला मंच बस्तर तर्फे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये द नक्षल स्टोरीच्या प्री-रिलीझ स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते.
दुसरीकडे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला. १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी घोषणाबाजी केली. आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांचा प्रवेश रोखला. एसएफआयने दोनदा सभागृहाचे दिवेही तोडले.