डी बी पथकाची कारवाई ; दुचाकीसह लॅपटॉप, मोबाईल, एलसीडी जप्त
वाघोली- लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यात लोणीकंद पोलिसांना वॉन्टेड असणारा चोरटा वाघोली येथील ट्रॅफीकमधून जाताना डी. बी. पथकाच्या चपळाईमुळे केसनंद फाटा येथे अलगद सापडला. त्याच्याकडील दुचाकीसह दोन लॅपटॉप, एलसीडी व दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. प्रकाश ऊर्फ राहुल शामराव डुकळे (रा. उबाळेनगर, वाघोली) असे लॅपटॉप चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. केसनंद फाटा येथे असणाऱ्या ऋषिराज कॉम्प्लेक्स येथून लॅपटॉप चोरून नेल्याची फिर्याद लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. डी. बी. पथकाने कॉम्प्लेक्सचे सीसीटीव्ही व गुन्ह्यातील दुचाकीच्या सहाय्याने राहुल डुकळे याचा तपास केला असता त्याचा वाघोली परिसरामध्ये वावर व खुळेवाडी येथे वास्तव्य असल्याचे कळाले. पोलिसांनी खुळेवाडी येथे तपास करूनही त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि. 18) सकाळी रुट मार्चचे आयोजन केले होते. केसनंद फाटा येथे रूट मार्च समाप्त होत असताना ट्रॅफीकमध्ये संशयित डुकळे जात असल्याचे पथकाचे कर्मचारी ऋषिकेश व्यवहारे यांना दिसला. त्यांनी तात्काळ गाडी आणि डुकळे यास ओळखून गाडीसह अलगद पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता लॅपटॉप चोरीची त्याने कबुली दिली. त्याच्याकडून दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, एलसीडी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर सोलापूर येथील वाळुंज पोलीस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे, विनोद माने यांनी केली.