हैदराबाद – 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्या आरोपीचा रेल्वेरुळावर मृतदेह मिळाला आहे. हे कृत्य केल्यानंतर आरोपी फरार होता. मात्र त्याचा आज पोलिसांना घानपूर भागात रेल्वे रुळावर मृतदेह आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/TelanganaDGP/status/1438378108575313923
राजू वय 30 असे मृत आरोपीचे नाव असून त्याने 9 सप्टेंबर रोजी 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली होती. ही घटना हैदराबादच्या सैदाबादमध्ये घडली होती. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात होता. तसेच आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा स्थानिकांनी केली होती. त्यातच राजूचा मृतादेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचा एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह मिळाला आहे. मात्र आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले असून तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.