नगर – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ज्या महिला शिक्षकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत ते सर्व बदलून त्यांच्या जागी पुरुष शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,जिल्हा उपनिवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीनींना दिले.
दैनिक प्रभातने याविषयावर आजच्या अंकात प्रकाश टाकत याविषयावर लक्ष वेधले होते. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा प्रथमच महिला शिक्षिकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत. सदरचे काम जोखमीचे व महिलांसाठी गैरसोयीचे असल्याने याबाबत जिल्ह्यातील महिला भगिनींनी तीव्र नाराजी व्यक्त करून सदर आदेश बदलण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष बापू तांबे, नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, राज्य संघाचे उपाध्यक्ष कैलास चिंधे, दत्ता कुलट, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे, रामेश्वर चोपडे, बाळासाहेब मुखेकर, शिक्षक बॅंकेचे चेअरमन साहेबराव अनाप,संचालक बाबा खरात,दिपक बोऱ्हाडे,प्रविण साळवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्युलता आढाव,मिना जाधव आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांची भेट घेऊन महिलांना या कामासंदर्भात येणाऱ्या अडचणी समजावून सांगितल्या.
तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले,जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे,संजय शिेंदे,रा.वि.शिंदे ,बी.व्ही.धरम,बाळासाहेब देंडगे,अंबादास गारूडकर,दत्तात्रय गमे आदींनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी व जिल्हा उपनिवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेतली. ठुबे यांनी याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचे ई मेलव्दारे याविषयावर लक्ष वेधले.
महिला शिक्षकांना मतदान अधिकारी दोन किंवा तीन क्रमांकाची ड्युटी द्यावी व सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या पुरुष शिक्षकांना ज्यांना अद्याप आदेश देण्यात आलेले नाहीत त्यांच्या नियुक्त्या कराव्यात व महिलांची गैरसोय टाळावी अशी विनंती करण्यात आली. मतदान केंद्राध्यक्ष यांची कामे अडचणीचे व रात्री उशिरापर्यंत चालणारे असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी या प्रश्नी योग्य ते बदल करून ज्या महिला शिक्षिकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्षाची नेमणूक देण्यात आली आहे ती बदलण्यात येईल असे आश्वासन संबंधीतांनी दिले. राज्यात फक्त नगर जिल्ह्यात अशा पद्धतीने नेमणुका देण्यात आल्याने महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली होती. याची शिक्षक संघाने तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांचे याप्रश्नी लक्ष वेधले. महिला शिक्षकांच्या नेमणुकीचे आदेश लवकरच बदलण्यात येतील असें आश्वासन संबंधीतांनी दिले.