इंदोर – रस्त्यावर अंडे विकणाऱ्या मुलाने पालिका कर्मचाऱ्यांना १०० रुपयांची लाच न दिल्यानं त्याच्या हातगाडीचे नुकसान करत अंडी रस्त्यावर फेकून दिलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. लॉक डाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांचे प्रचंड हाल होत असतानाच पालिका कर्मचाऱ्यांच्या या निष्ठुर वागणुकीमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मात्र या गरीब मुलाबाबत नेटकऱ्यांनी व्यक्त केलेली तळमळ ही केवळ लाईक्स अन् कमेंट्स -पुरतीच मर्यादित राहिली असं नाही…
रस्त्याच्या कडेला अंड्याचा ठेला लावणाऱ्या या मुलाचं नाव पारस रैक्वार असं असून तो मूळचा इंदोरचा. रैक्वार कुटुंब स्मशानभूमीत उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहे. कुटुंबाची सर्व जबाबदारी पारसच्या खांद्यावर आहे. त्याने काम केलं तरच घरातील चूल पेटणार अशी दयनीय अवस्था.
मात्र आता परसचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजातील अनेक दानशूर व्यक्ती त्याच्या मदतीस धावून आलेत. पारसला आता विविध स्तरांतून मदत मिळत असून काहींनी त्याला नुकसान झालेली अंडी दिलीयेत तर काहींनी महिनाभराचा किराणा दिलाय.
पारसच्या दयनीय अवस्थेबाबत येथील स्थानिक आमदाराला समजले असता त्यांनी देखील मदतीचा हात पुढे केला असून स्मशानभूमीत राहणाऱ्या पारसला आता हक्काचं घर मिळालंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या एका व्हिडीओमुळे अत्यंत हालाकीत दिवस काढणाऱ्या पारसला आता दिलासा मिळालाय.
View this post on Instagram
MLA Ramesh Mendola ne apne nivas par Paras Raikwar ko cycle or flat k kagaz sopey.