केळघर – जावळी तालुक्यात करोनाने थैमान घातले असून केळघर येथील एकाच कुटुंबातील चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने येथील नागरिकांची झोपच उडाली असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
केळघर येथील 55 वर्षीय पुरुष वरळी येथून खासगी इनोव्हाने (एमएच 46 एडी 2123) प्रवास करून त्यांचा एक नातू वय 12 व नात वय 16 यांना घेऊन 19 मे रोजी केळघर येथे दाखल झाले. या वाहनाने प्रवास केल्याने संबंधित वाहनचालकाशी संपर्क करून त्यालाही रायगाव येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. 23 मे रोजी तापाची लक्षणे दिसून आल्याने 55 वर्षीय पुरुषासह त्यांच्या पत्नी वय- 52 यांनाही पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले. रविवारी रात्री त्या चारही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने केळघर गावासह संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.
जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, केळघर प्राथमिक केंद्राच्या डॉ. साधना कवारे, सरपंच रविंद्र सल्लक, पोलीस पाटील विष्णू दळवी, तलाठी बी. व्ही. ढाकणे, ग्रामसेवक एस. एच. निर्मल, आरोग्य सहाय्यक विशाल रेळेकर, सतीश मरडेकर, एम. पी. शिंदे, आरोग्य सेविका ए. एम. शेख यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी पाहणी करुन परिसरासह संपूर्ण गावात आरोग्य विषयक सूचना देऊन संपूर्ण केळघर गावाच्या हद्दी बंद करुन केळघर गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. आजीआजोबांसह दोन्हीही नातवंडांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा मुलगा व सुनेचाही अहवाल पॉझिटिव्ह असून ते दोघेही मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या निकट सहवासातील 6 जणांना आज तपासणीसाठी रायगांव येथे पाठवणेत आले आहे. तर घराच्या परिसरातील 27 जणांना सुरक्षिततेच्या दृष्टीने होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
केळघर ही जावळी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून परिसरातील 15 ते 20 गावे या गावाला जोडलेली आहेत. केळघरमध्ये चार रुग्ण सापडल्याने येथील नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. या आठवडाभरात केळघर परिसरातील वरोशी येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील करोनाबाधित 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
गवडी येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने केळघर परिसरातील नागरिकांनी धसका घेतला होता. आठवडाभरात केळघर येथील नागरिकांना रविवारी रात्री तिसरा धक्का देणारी बातमी धडकली. केळघर येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आठवडाभरात वरोशी 2, गवडी 2, केळघर 4 असे 8 करोना रुग्ण झाले.