राज्यातील 165 आश्रमशाळांना अनुदान मिळावे यासाठी सोमवारी थाळीनाद आंदोलन

पुणे : राज्यातील 165 आश्रमशाळांना वारंवार मागणी करुनही अद्यापही शासनाकडून अनुदान सुरु झालेले नाही. यामुळे या आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने अनुदानाचा प्रश्‍न त्वरीत मार्गी लावावा यासाठी शाहू-फुले-आंबेडकर निवासी शाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.27 जुलै) राज्यव्यापी थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

आश्रमशाळा अनुदान देण्याबाबत शासनाने अनेकदा आश्‍वासने दिली आहेत. प्रत्यक्षात मात्र शाळांना अनुदानाचा एक रुपयाही मिळालेला नाही. आश्रमशाळांची तपासणीही पूर्ण करण्यात आलेली आहे. शासनाने अनुदानाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी यामागणीसाठी एक दिवसाचे राज्यव्यापी थाळीनाद व पोस्टर आंदोलन करणार आहे. अनुसूचित जातीच्या शासन निर्णय झालेल्या आश्रमशाळांना अनुदान मिळावे यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कृती समितीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनही पाठविले आहे.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हक्काचे वेतन सुरु झाले पाहिजे. प्रचलित पद्धतीनुसार अनुदान वितरीत होईपर्यंत आणि जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्यात येणार आहे. येत्या 10 ऑगस्टपर्यंत मंत्र्यांना मोठ्या संख्येने पत्रही पाठविण्यात येणार आहे.

सामाजिक न्यायमंत्री जागे व्हा, आमचे वेतन सुरु करा, माझे वेतन हा माझा अधिकार, प्रचलितनुसार अनुदान द्या अशा घोषणाचे पोस्टर तयार करुन करोनाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर घरात राहून आंदोलन करण्यात येणार आहे असे कृती समितीचे अध्यक्ष संदिप केकान, उपाध्यक्ष दादासाहेब आगे, संघटक विठ्ठल सरगर, कोषाध्यक्ष मनोज बोर्डे यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.