नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्युट सध्या बीसीजीच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर संसर्ग कमी करण्याची क्षमता तपासण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहे. ज्यांना कोविड-19 चा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, अशा ज्येष्ठ नागरिक, रक्तदाब, मधुमेह आदी विकार असलेल्या व्यक्ती आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमधील संसर्गाचे प्रमाण कमी राखण्याच्या दृष्टीने या चाचण्या केल्या जात आहेत.
याशिवाय कोविड रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींसह वैद्यकीय कर्मचारी मिळून सुमारे 6 हजाऱ् जणांना “रेकंबिनंट बॅसिलस कॅलमेट गुरियन’ अर्थात “बीसीजी’च्या सुधारीत लसीच्या चाचणीसाठी उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहे. या लसीमुळे या उमेदवारांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढते का, हे या चाचणीतून तपासले जात आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत देशातील प्रत्येक नवजात अर्भकाला क्षयरोगापासून संरक्षणासाठी “बीसीजी’ची लस दिली जाते.
“बीसीजी’ची क्षमता तपासण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करायला पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या “नॅशनल बायोफार्मा मिशन’ अंतर्गत सहाय्य केले जात आहे.
“बीसीजी’च्या लसीची वैशिष्ट्ये सिद्ध झाली आहेत आणि टीबी व्यतिरिक्त इतर रोगांवर होणाऱ्या परिणामांना तपासणे हा सध्याचा एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे, असे “बीआयआरएसी’च्या सचिव रेणू स्वरूप म्हणाल्या. ही चाचणी मे महिन्यात सुरू झाली आणि देशभरातील जवळपास 40 रुग्णालयांमध्ये 6,000 उमेदवारांची नोंदणी पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.