गावकीच्या राजकारणात स्थानिक नेत्यांची कसोटी

नाव पुकारल्याने नाइलाज

गावातील पुढाऱ्याच्या हातात माईक गेला की मग तो समोर दिसेल, त्याचे नाव पुकारून दोन शब्द बोलण्याचा आग्रह धरतो. त्यामुळे समोरच्यालाही पक्षनिवेश बाजूला ठेवून वेळ मारून न्यावी लागते. संबंधित राजकीय नेता अशा भाषणबाजीने सुखावून जात असला तरी त्यावेळी भाषणाची वेळ आलेल्या नेत्याला काय कसरत करावी लागते हे त्यालाच माहीत.

नगर – निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांनी ग्रामीण भागातील गावे पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे. मर्यादित लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असलेल्या गावांमध्ये प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या प्रत्येकाचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो गावात प्रचारासाठी आला की स्थानिक हितसंबंधासाठी विरोधी विचारसरणीच्या उमेदवारासाठीही स्थानिक नेत्यांना माईक हाती घ्यावा लागत आहे. याला अपवाद काही कट्टर समर्थक गावांचा समावेश असू शकतो, मात्र तरीही थेट विरोधाची भूमिका फारशी घेतली जात नाही. नगर लोकसभा मतदारसंघात तरी सध्या अशाच प्रकारचे चित्र आहे.

गावकीच्या राजकारणात मान-सन्मानही तितकाच महत्त्वाचा असल्याने गावात येणाऱ्या उमेदवारांना गावातील सरपंचासह इतर राजकीय पक्षांच्या मान्यवरांना देखील आमंत्रित करावे लागते. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाची कोंडी अधिक होत असून, आलेल्या प्रत्येकाला भाऊ, आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत असे म्हणत वेळ मारून न्यावी लागत आहे. विस्तीर्ण अशा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात खेडेगावांचा परिसर असून, उमेदवारांचे बहुतांश गणित हे गावांमधील मतदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचाराला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना रोजच नवनवीन गावे गाठावी लागत आहेत.

नगर लोकसभा मतदारसंघात श्रीगोंदा, पारनेर, कर्जत-जामखेड, राहुरी, शेवगाव, नगर शहर या मतदारसंघांचा समावेश होतो. यातील चार मतदारसंघ असे आहेत की त्यामध्ये 70 टक्के मतदार हे ग्रामीण भागातील आहेत. उमेदवाराच्या गाड्यांचा ताफा गावात शिरला की मग गावातील मारुती मंदिर किंवा समाजमंदिरात छोटेखानी सभा ठेवली जाते. अशावेळी गावातील सर्वांनाच आमंत्रित करावे लागते.यामध्ये स्थानिकपातळीवरील सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्तेही हितसंबंधासाठी आमंत्रित केले जातात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.