पुणे – पुण्यातील “मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स कंपनी’ने तयार केलेले करोना टेस्टिंग किट “कोविसेल्फ’ हे शुक्रवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहे. या किटच्या सहाय्याने घरच्या घरी अँटीजेन टेस्ट करता येणार आहे. “मायलॅब’चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ यांनी याविषयी माहिती दिली. हे किट 250 रुपयांना मिळेल.
पहिली स्वदेशी करोना चाचणी किट निर्माण करणाऱ्या “मायलॅब बायोटेक्नॉलॉजी कंपनी’ने गेल्या आठवड्यात या नवीन अँटीजेन किटची घोषणा केली होती. ही किट त्यांनी आठ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ते विक्रीसाठी आणले आहे.
नाकातून स्वतःच स्वॅबचा नमुना घेऊन नागरिकांना स्वत:ची करोना टेस्ट करता येणार आहे.
मात्र, लक्षणे असतील आणि किटच्या माध्यमातून केलेली टेस्ट निगेटिव्ह असेल तर मात्र “आरटीपीसीआर’ करावीच लागणार असल्याचे “आयसीएमआर’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्राथमिक माहितीसाठी या टेस्टचा उपयोग होणार आहे. “मायलॅब’ने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी बाजारात 10 लाख “कोविसेल्फ’ किटचे वितरण करण्यात आले आहे.